रमजान ईदनिमित्त ईदगाह मैदानावर पहाटेपासूनच श्रद्धा, शांतता आणि एकतेचे सुंदर चित्र; “सर्वांसाठी सुख-शांती” अशी अल्लाहकडे प्रार्थना

shivrajya patra

सोलापूर : रमजान ईदनिमित्त शहरातील ईदगाह मैदानावर आज पहाटेपासूनच श्रद्धा, शांतता आणि एकतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. शेकडो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि “सर्वांसाठी सुख-शांती” अशी प्रार्थना अल्लाहकडे मागितली.

रमजान महिन्याभराच्या संयम, त्याग आणि आध्यात्मिक साधनेनंतर आलेल्या ईदने समाजात आनंदाचे वातावरण निर्माण केले. महिनाभर रोजे पाळत, कुरआन पठण करत आणि स्वतःला शिस्तीत ठेवत मुस्लीम बांधवांनी आत्मशुद्धी साधली. त्याचबरोबर ईदपूर्वी जकात आणि फित्रा देत समाजातील गरजू, वंचित घटकांनाही सणाचा आनंद मिळावा, याची काळजी घेतली.

ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर मोठी गर्दी उसळली होती. सर्वांनी एकत्र नमाज अदा करत “एकता, समता आणि बंधुभाव” यांचा संदेश दिला. नमाजनंतर एकमेकांना मिठी मारत “ईद मुबारक” च्या शुभेच्छा देण्यात आल्या, ज्यातून सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसले. होटगी रोड परिसरात आलमगीर ईदगाह येथे शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली यांनी सामूहिक नमाज अदा केली.

एकंदरीत रमजान ईदनिमित्त सोलापूर शहरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नवीन कपडे परिधान करून मुस्लीम बांधव ईदगाहकडे मोठ्या आनंदात रवाना होत होते. ईदची नमाज संपल्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत “ईद मुबारक” च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बंधुभाव आणि आपुलकीचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. 

अनेकांनी एकमेकांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देत पारंपरिक सुरकुर्मा आणि गुलगुले यांचा आस्वाद घेण्यासाठी आग्रह केला. एकूणच, ईदच्या निमित्ताने सोलापूर शहरात प्रेम, आपुलकी आणि एकतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला. सर्वात शेवटी ईद ची नमाज आसार मैदान ईदगाह येथे सकाळी 10:30 वाजता पार पडली.

अहले हादिस ईदगाह रंगभवन येथेही हजारो मुस्लिम बांधव सकाळी 7:30 वाजता नमाज साठी एकत्र जमले. यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी नमाज पठण केली.

पानगल मैदान येथील शाही आलमगीर ईदगाह येथे सकाळी 9 वाजता नमाज पठण करण्यात आली. येथे मौलाना सय्यद अहमद गौरी हैद्राबादी यांनी नमाज नंतर सामूहिक प्रार्थना केली. यानंतर येथे सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट घेत ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

जुनी मिल कंपाऊंड येथील ईदगाह येथे सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ईद चा आंनद जाणवत होता. लहान मोठे सर्वजण नवीन कपडे परिधान करून सुंगधित इत्र लावून डोळ्यात सुरमा लावत ईद च्या नमाज साठी दाखल झाले. यावेळी मोहम्मद सय्यद फजुलूल्लाह खतीब यांनी नमाज अदा केली.

... चौकट

आपल्यातला भेदभाव-स्वार्थपणा सोडा

"फक्त नमाज आणि रोजे पुरेसे नाहीत, तर आपल्या वर्तनात बदल दिसला पाहिजे,"नफरत, भेदभाव आणि स्वार्थ सोडून मोहब्बत, भाईचारा आणि इंसानियत जपण्याचे त्यांनी आवाहन केले. "जर आपल्या शेजाऱ्याच्या घरात भूक आहे, तर आपली ईद अपुरी आहे."

मौलाना ताहेर बेग, 

(अहले हादिस ईदगाह, रंगभवन)

... चौकट 

समाजात शांतता टिकवणे हिच खरी ईद

रमजान महिना आपल्याला संयम, त्याग आणि मानवतेचा धडा शिकवतो. ईद हा फक्त आनंदाचा सण नसून, गरजूंची मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा दिवस आहे. समाजात प्रेम, ऐक्य आणि शांतता टिकवणे हीच खरी ईद असेल.

मौलाना सादिक मणियार, 

(आसार ईदगाह)

... चौकट 

ईदचा खरा अर्थ – इंसानियत !

नफरत पसरवणं थांबवा, गरजूंना साथ द्या, एकमेकांचा आधार बना. शांतता, प्रगती आणि समृद्धीने आपला भारत देश भरून जावो, हीच अल्लाहकडे प्रार्थना करतो. सर्व समाजातील लोकांमध्ये एकता आणि शांतता टिकून राहिली, तरच देशाची प्रगती शक्य आहे. ईद आपल्याला प्रेम आणि इंसानियत जपण्याची शिकवण देते.

सय्यद मोहम्मद खतीब,

(आदिलशाही ईदगाह, जुनी मिल कंपाऊंड)

... चौकट 

मनात द्वेष, मत्सर किंवा राग ठेवणे हे इस्लामच्या शिकवणीला अशोभनीय

इस्लाम धर्माचा मूलभूत संदेश अत्यंत सुंदर आणि मानवतेने परिपूर्ण आहे. तो आपल्याला शिकवतो की, आपण कोणालाही त्रास देऊ नये.आपल्या वागणुकीतून इतरांना नेहमीच फायदा कसा होईल याचा विचार हा उलट प्रेम, करुणा, सहकार्य आणि बंधुभाव यांच्याद्वारे समाजात शांतता निर्माण होते.

आपण जर इस्लामच्या तत्त्वांनुसार प्रामाणिकपणे जीवन जगलो, तर नक्कीच आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान येईल.

मौलाना सय्यदअहमद गौरी,

(पानगल मैदान, शाही आलमगीर ईदगाह)

... चौकट

धार्मिक व आधुनिक शिक्षणाचा समतोल,

आजच्या काळात धार्मिक आणि आधुनिक शिक्षणामध्ये समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. आज मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणासोबत इंग्रजी आणि मराठीचे शिक्षण दिले जात आहे, ही एक सकारात्मक बाब आहे; मात्र यासोबतच विज्ञानाची मूलभूत माहिती देणेही काळाची गरज आहे, ज्यामुळे विद्यार्थी आधुनिक जगाशी अधिक सुसंगत राहू शकतील.

त्याचप्रमाणे, आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांनीही धार्मिक शिक्षण आणि संस्कार आत्मसात करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनात नैतिक समतोल राहील.

हा समन्वय एक जागरूक आणि संतुलित पिढी घडवण्यास मदत करेल तसेच इस्लामबद्दल असलेल्या गैरसमजांना दूर करण्यासही उपयुक्त ठरेल.

मुफ्ती सय्यद अमजदअली काझी,

 (सोलापूर शहर काझी, होटगी रोड ईदगाह)

To Top