“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत ‘समाधान’ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

shivrajya patra

कासेगांव / संतोष पवार : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर यांच्या वतीने बोरामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत ‘समाधान’ शिबिर आयोजित करण्यात आले होते. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराचा शेकडो नागरिकांनी एकाच दिवशी लाभ घेतला.

बोरामणी जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य नेताजी खंडागळे व पंचायत समिती सदस्य विजय राठोड यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून सदर अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी बोरामणीच्या सरपंच अरुणा साळुंखे, धनेश अचलारे, सोमनाथ पटणे, सिद्धाराम हेले, अनिता माळगे, ग्रामपंचायत सदस्य, शासकीय विभागांचे विविध अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित या शिबिरात प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी असलेले ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे दाखले, विविध प्रमाणपत्रे, निराधार योजना, घरकुल बांधकामासाठी वाळू पावत्यांचे वितरण आणि नवीन बिनशेती (एन.ए.) सुधारणा आदी विविध कामे महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली.

याशिवाय पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, पोलीस विभाग, महावितरण, महापारेषण, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग आदींसह शासकीय विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिबिरात सहभागी नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या. 

विविध शासकीय योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली. यावेळी दक्षिण सोलापूरचे प्रांताधिकारी सुमित शिंदे तसेच तहसीलदार किरण जमदाडे यांनी शिबिरास भेट देऊन पाहणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या आपल्या रयतेची काळजी घेणाऱ्या महापुरुषाच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या ‘समाधान’ शिबिराचे तहसील कार्यालयाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन केले होते. शिबिरात सहभागी प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत होते. या शिबिरासाठी बोरामणी गटातील सर्व गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

... कोट- १

“नागरिकांना दिलेल्या सुविधांचा आनंद आणि त्यांच्याकडून मिळालेला आशीर्वाद आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजनेअंतर्गत योग्य ती कार्यवाही सुरू असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित प्रश्नांचे जास्तीत-जास्त निराकरण होईल.”

किरण जमदाडे,

तहसीलदार, दक्षिण सोलापूर.

--- कोट २

“दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘समाधान’ शिबिराचा माझ्या मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. लोकांपर्यंत पोहोचून त्यांची कामे तत्परतेने होत असल्याने समाधान वाटते. ज्या नागरिकांची कामे कागदपत्रांच्या अभावामुळे प्रलंबित राहिली आहेत, त्यांचे प्रश्न पुढील महिन्यात मार्गी लावले जातील. तसेच दर महिन्याला अशा प्रकारची शिबिरे आपल्या मतदारसंघात आयोजित करण्यात येणार आहेत.”

नेताजी खंडागळे,

जिल्हा परिषद सदस्य, बोरामणी.

To Top