शीर्षक नाही

shivrajya patra

तातडीने पंचनामे करण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

सोलापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नवनिर्वाचित शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली. "सरकार आणि लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत," असा शब्द देत त्यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिला.

नुकसानीची भीषणता आणि शेतकऱ्यांच्या व्यथा

येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. द्राक्ष बागा, केळी, आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, अनेक ठिकाणी गोठे आणि घरांचीही पडझड झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

तातडीने मदतीसाठी हालचाली

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. ज्योती वाघमारे यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मोहोळ तालुक्यातील या नैसर्गिक आपत्तीची माहिती देत त्यांनी शासनाकडून तातडीने मदतीची मागणी केली. 

तसेच उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी आणि सर्कल ऑफिसर यांना त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या, जेणेकरून एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

... या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती !

या दौऱ्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख व झेड. पी. सदस्य चरणराज चवरे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, नगरसेवक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, भीम वाघमारे, दीपक पाटील यांच्यासह संबंधित कृषी अधिकारी, तलाठी, सर्कल ऑफिसर, शिवसैनिक आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

... चौकट 

नुकसानभरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात पडेपर्यंत मी पाठपुरावा करेन : खासदार डॉ. ज्योती वाघमारे

"शेतकऱ्यांचे हे नुकसान पाहून मन हेलावले आहे. केवळ पंचनामे करून न थांबता, नुकसानभरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात पडेपर्यंत मी पाठपुरावा करेन. उपमुख्यमंत्री यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच दिलासादायक निर्णय होईल."

- डॉ. ज्योती वाघमारे (खासदार, सोलापूर.)

To Top