कासेगांव येथे विद्यार्थीनींना क्रीडा साहित्याचे वितरण; समृद्धी ग्रामविकास अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

shivrajya patra

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेत प्रिसिजन फाउंडेशन आणि सेवावर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने समृद्धी ग्रामविकास अभियान अंतर्गत किशोरवयीन विद्यार्थीनींसाठी क्रीडा साहित्य वितरणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील मुलींमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करून त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी सरपंच यशपाल वाडकर, प्रिसिजन फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, नितीन फलटणकर, वैशाली बनसोडे, सेवावर्धिनीचे प्रकल्प व्यवस्थापक विद्यागौरी कुलकर्णी, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी चन्नवीर बंकुर, शिरीष तेरखेडकर तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ, कासेगाव संस्थेचे सचिव सच्छिदानंद चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची प्रस्तावना रेश्मा कदम यांनी केली. त्यांनी समृद्धी ग्रामविकास अभियान अंतर्गत कासेगांवमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातील संधी किती महत्त्वाच्या आहेत, यावर त्यांनी विशेष भर दिला.

माधव देशपांडे यांनी आपल्या मनोगतात खेळाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघभावना, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच खेळामुळे मैत्री वृद्धिंगत होते, पराभव स्वीकारण्याची ताकद मिळते आणि जिंकण्याची जिद्द निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.

या क्रीडा साहित्यामुळे गावातील मुलींना मोठे प्रोत्साहन मिळेल व त्या क्रीडा क्षेत्रात प्रगती करून आपल्या गावचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास सरपंच यशपाल वाडकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त करताना त्यांनी प्रिसिजन फाउंडेशन व सेवावर्धिनी संस्थेचे आभारही मानले. 

या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना बुद्धिबळ, क्रिकेट साहित्य, कॅरम बोर्ड, व्हॉलीबॉल, टेनिस साहित्य, गोळाफेक संच, बॅडमिंटन आदी विविध क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. या साहित्यामुळे मुलींना शाळा व गाव पातळीवर नियमित सराव करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली बौद्धिक क्षमता दाखवून दिली.

यावेळी प्रकल्प समन्वयक प्रदीप माने, संस्थेचे विश्वस्त अमोल चौगुले, कोळी सर, क्रीडा शिक्षक जाधव, राऊत, संतोष चौगुले, मते मॅडम, आस्टे मॅडम, चौगुले मॅडम तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी सच्छिदानंद चौगुले यांनी आभार प्रदर्शन केले. 

To Top