सोलापूर : National Food Security Act, 2013 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत सोलापूर शहर व ग्रामीण भागासाठी वाढीव धान्य इष्टांक मंजूर करण्याची मागणी केलीय.
01 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार सोलापूर शहरासाठी प्राधान्य कुटुंब योजना (PHH) अंतर्गत 5,15, 994 तर सोलापूर ग्रामीण भागासाठी 16, 25, 234 इतका इष्टांक निश्चित करण्यात आला आहे. मात्र शासनाने निश्चित केलेला हा इष्टांक अत्यंत अपुरा असल्याने मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी रेशनकार्ड धारकांकडून सातत्याने येत असल्याचे खासदारांनी निवेदनात म्हटलं आहे.
शासनाकडून देण्यात आलेला इष्टांक हा अत्यंत कमी असल्याने माझ्या मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात धान्यापासून वंचित रहावं लागत आहे. रेशनकार्ड लाभार्थी तशा स्वरुपाच्या तक्रारी माझ्याकडे मोठ्या प्रमाणात करीत आहेत, सोलापूर शहरामध्ये शून्य इष्टांक उपलब्ध असून सोलापूर ग्रामीण मधील 11 तालुक्यांमध्ये 17, 608 इतका इष्टांक शिल्लक असल्याचे दिसून येत आहे, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे
खासदार प्रणिती शिंदे यांनी, मतदारसंघातील सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण मधील सविस्तर माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना दिलेल्या निवेदनासोबत जोडलेली आहे.
त्यांनी सोलापूर शहरासाठी 50,000 आणि सोलापूर ग्रामीणसाठी 3, 00,000 इतका इष्टांक उपलब्ध होऊन मिळावा, अशी आग्रही मागणी त्या निवेदनात केलीय.