डबल मर्डर... ! उच्च न्यायालयात आरोपीस जामीन मंजूर

shivrajya patra
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथे घडलेल्या डबल मर्डर प्रकरणात आरोपी गणेश लक्ष्मण ढोबळे याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच ने जामिनावर मुक्तता केली. आरोपी गणेश ढोबळे याच्यातर्फे ॲड. जयदीप माने यांनी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापुर सर्किट बेंच मध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. 

या प्रकरणाची हकीकत अशी की, गुंजेगांव येथील रिना ढोबळे हिचा पती अप्पासाहेब ढोबळे  यांचं पाच वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती चंद्रकांत तात्यासाहेब पाटील याच्यासोबत राहत होती. तिचे व शेजारील शेतकरी लक्ष्मण ढोबळे यांचे पाईपलाईनच्या चेंबरच्या कारणावरुन वाद होता. यासंबंधी उभयतांनी एकमेकांविरुध्द पोलिसात फिर्याद दाखल केल्या होत्या. 

त्यामुळे आलेल्या वैमनस्यातून लक्ष्मण ढोबळे, गणेश ढोबळे याच्यासह 07 जणांनी संगनमताने रिना ढोबळे आणि चंद्रकांत तात्यासाहेब पाटील यांचा 11 मार्च 2025 रोजी सकाळी पूर्ववैमनस्यावरुन लोखंडी कोयता-हातोडा आणि पाईपने मारुन खून केल्याच्या आरोपात मंगळवेढा पोलिसांनी दोषारोप पत्रक पाठवले होते. 

या डबल मर्डर प्रकरणातील आरोपी गणेश ढोबळे याचा जामिन अर्ज पंढरपूर सेशन्स कोर्टानी फेटाळून लावला होता. त्यानंतर आरोपी गणेश ढोबळे यांचेतर्फे ॲड. जयदीप माने यांनी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. 

सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये आरोपी गणेश ढोबळे याच्या सहभागाबद्दलच्या साक्षीदारांच्या विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर आरोपी गणेश लक्ष्मण ढोबळे याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच ने जामिनावर मुक्तता केली.

या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. एन. बी. पाटील यांनी काम पाहिले.
To Top