नव्या पिढीच्या मनोरंजनात कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' चा आशीर्वाद चे 500 भाग पूर्ण

shivrajya patra

अभिषेक सोहळ्याला वेगवेळ्या मालिकांतील 3 अभिनेत्रींची उपस्थिती

सोलापूर : नव्या मराठी वर्षात तमाम मराठी रसिक प्रेक्षकांची लाडकी वाहिनी 'कलर्स मराठी' नव्या पिढीचे नवे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली असून 'मी जिंकून घेईन सार' आणि 'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' या मालिकांनी या नव्या मराठी वर्षाची दमदार सुरुवात झाली आहे.  यामध्ये दुग्धशर्करा योग म्हणजे या नव्या मनोरंजनासाठी देवी आशीर्वादाचा अपूर्व योग जुळून आला होता, तुळजापुरात होणाऱ्या आई तुळजाभवानीच्या देवी अभिषेकाचा, आई तुळजाभवानी मालिकेच्या पाचशे यशस्वी भागांच्या पूर्ततेनिमित्त बुधवारी या अभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे मराठीत पहिल्यांदाच तीन मालिकाच्या नायिका एकत्र आई तुळजाभवानीच्या दर्शनाला आल्या. आई तुळजाभवानीच्या भूमिकेतील अभिनेत्री पूजा काळे हिच्या उपस्थितीत झालेल्या या अभिषेक सोहळ्यात तिच्या सोबतीने छवी जान्हवी तांबट आणि 'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेतल्या मुख्य अभिनेत्री सहभागी झाल्या. नव्या मनोरंजनासाठी सब या मालिकांसाठी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद त्यांनी घेतला.

हा अपूर्व क्षण छवी आणि मोहिनीच्या नव्या वाटचालीला मिळालेला मानाचा, अत्यंत मौल्यवान आशीर्वाद आहे. आपल्या लाडक्या मालिकांमध्ये काय घडणार जाणून घेण्यासाठी पहा आई तुळजाभवानी दररोज संध्या ६ वा. 'मी जिंकून घेईन सारं संध्या ७ वा. आणि मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी संध्या ७.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर, ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी साकारलेली बाईआजी आणि त्यांचे जिच्याशिवाय पान हलत नाही अश्या छवीची भूमिका करणारी जान्हवी तांबट यांची धमाल जोडी प्रेक्षकांना आपलीशी वाटते आहे. 

सिनेमाच्या सेटवर जन्मलेल्या मोहिनीची आव्हानात्मक भूमिका अनघा ठाकूर साकारत असून तिच्या निरागस डोळ्यांनी तिने प्रेक्षकांना आपलेसे केले असून तिचा हा आगळावेगळा प्रवास पाहण्याची विशेष उत्सुकता प्रेक्षकांना आहे. (आई तुळजाभवानी मालिका) पूजा काळे म्हणाली, तुळजापूरच्या पवित्र मंदिरात जाऊन आईचं दर्शन घेण्याचा आणि तिच्या साक्षीने प्रार्थना करण्याचा अनुभव माझ्यासाठी शब्दात न मावणारा आहे. त्या क्षणी कलाकार म्हणून नव्हे तर एक श्रध्दाळू म्हणून मन पूर्णपणे भारावून गेले. डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले.

देवी ऊर्जेमुळे ही भूमिका साकारताना अधिक जबाबदारीची जाणीव होते आणि प्रत्येक दृश्य अधिक प्रामाणिकपणे साकारण्याची प्रेरणा मिळते. 'आई तुळजाभवानी' या मालिकेमुळे मला अभिनेत्री म्हणून खूप समृद्ध करणारा प्रवास अनुभवायला मिळतो आहे.

या मालिकेत देवीची विविध रूपं साकारताना प्रत्येक वेळेस वेगळी ऊर्जा, वेगळी देहबोली आणि वेगळं भावविश्व उभं करावं लागतं आणि हाच या भूमिकेचा सर्वात मोठा अभिनयात्मक आनंद आहे. दैवी व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारताना केवळ वेशभूषा पुरेशी नसते; त्यामागे प्रचंड मानसिक एकाग्रता, शारीरिक तयारी आणि सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक असते. अनेक भव्य प्रसंग, ऍक्शन दृश्यं आणि भावनिक क्षण साकारताना संपूर्ण टीमसोबत केलेली मेहनत प्रत्येक भागात दिसून येते, आज मंदिरात भाविकही आवर्जुन भेट होते त्याने ही संपूर्ण टीमची मेहनत सफल झाल्याची भावना आहे. 

मोहिनी म्हणजेच अनघा ठाकूर म्हणाली, तुळजापूरला जाऊन आईचं दर्शन घेणं हा माझ्यासाठी खूप शांत आणि सकारात्मक अनुभव होता. नव्या प्रवासाच्या उंबरठ्यावर उभं असताना मनात अनेक भावना असतात, आणि त्या सगळ्यांना एक वेगळी स्थिरता इथे मिळाली.

'मोहिनी- प्रेमाची फिल्मी कहाणी ' मधील मोहिनीची भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास आहे भावनांनी भरलेली, स्वप्नांनी झपाटलेली आणि आयुष्याशी दोन हात करणारी. या प्रवासाची सुरुवात आईच्या आशीर्वादाने होत असल्यामुळे एक वेगळीच ताकद, ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. हा क्षण आणि नव्या प्रवासाची ही सुरुवात हा माझ्यासाठी आयुष्यभराचा अनमोल ठेवा आहे. 

छवी म्हणजेच जान्हवी तांबट म्हणाली, आज कलर्स मराठीवरील आम्हां नायिकांना तुळजापूरला जाऊन आईचं दर्शन घेण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूपच विशेष होतं. सेटवर ज्या देवीची भूमिका आपण पाहतो, त्याच मालिकेच्या प्रवासाचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मंदिरात जाणं हा खूप भावनिक अनुभव होता. 

त्या निमित्ताने माझ्या नव्या अभिनय प्रवासाला आईचे आशीर्वाद मिळाले हे मी माझे भाग्य समजते. 'मी जिंकून घेईन सारं' मधील छवी ही निरागस, मनमोकळी आणि नात्यांना जपणारी मुलगी आहे, आणि या भूमिकेला आईच्या चरणी नतमस्तक होऊन एक वेगळीच ऊर्जा मिळाली.

या दर्शनामु‌ळे जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली असून प्रेक्षकांचं प्रेम असंच मिळत राहावं, हीच आईराजा चरणी प्रार्थना, असंही त्यांनी यावेळी म्हटले.

कलर्स मराठीवर यशस्वी आध्यात्मिक मालिकांच्या यादीत मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या आई तुळजाभवानी मालिकेचे नुकेतच पाचशे भाग पूर्ण झाले असून आई तुळजाभवानी आणि महिषासुर यांच्यातील महायुद्धाची नांदी झाली आहे. सध्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर ही मालिका आहे. बहुप्रतीक्षित महिषासुर मर्दानीचा हा अध्याय प्रेक्षकांसाठी आई तुळजाभवानीच्या सामर्थ्य, धैर्य आणि शक्तीची भव्य प्रचिती देणारा ठरणार आहे.

To Top