मोहोळ तालुक्यातील वाफळे सजाचे तलाठी सुदर्शन रमेश जाधव (वय-30 वर्ष) यांनी वाफळे गावात तक्रारदार आणि इतर दोघांचे मुरूम वाहतुकीत गुंतलेले ट्रॅक्टर्स पकडले होते. मुरूम वाहतुकीत गुंतलेल्या त्या ट्रॅक्टर्सवर नियमानुसार कारवाई करण्याऐवजी ते सोडून देण्यासाठी तलाठी जाधव यांनी तक्रारदार व त्यांच्या सोबतच्या इतर 02 ट्रॅक्टर मालकांकडून प्रत्येकी 33,000 रुपये असं मिळून 99,000 रुपये देण्याचे ठरले होते.
त्यापैकी इतर दोन ट्रॅक्टर मालकांनी प्रत्येकी 33, 000 रुपये असे म्हणून 66,000 रुपये दिले. तक्रारदार यांच्याकडं 23,000 रुपये असल्याने त्यांनी तेवढेच रक्कम दिली होती. तक्रारदाराकडून उर्वरित 10,000 रुपये येणे बाकी असल्याने लोकसेवक तलाठी सुदर्शन जाधव यांनी त्यास शनिवारी, 28 मार्च रोजी देण्याबाबत सांगितले होते. 
त्यावरून तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी व सापळा कारवाई केली असता, आरोपी लोकसेवक सुदर्शन रमेश जाधव (पद तलाठी, सजा वाफळे ता. मोहोळ.) यांनी तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच स्वतःकरीता व त्यांच्या वरिष्ठांकरीता स्विकारताना शनिवारी ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी माढा पोलीस ठाण्यात सुदर्शन जाधव (मु.पो. विठठलवाडी, ता. माढा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया चालू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे (ए.सी.बी. पुणे मो. क्र. ९८२३१६७१५४), अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित पाटील (ए.सी.बी. पुणे. मो.क्र ९०२९०३०५३०), पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (ए.सी.बी. सोलापूर. मो.क्र. ९८२३२२५४६५) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव, संतोष नरोटे, अक्षय श्रीराम (सर्व नेमणुक- ए.सी.बी. सोलापूर) यांनी केली.
नागरिकांना आवाहन
लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (ए.सी.बी., सोलापूर. भ्रमणध्वनी क्र. ९८२३२२५४६५) यांनी केलं आहे.
