सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांचं संपूर्ण जाहीर भाषण संपेपर्यंत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांवाचा उल्लेख टाळला. हा प्रकार निषेधार्ह तितकाच संतापजनक आहे. गिरीष महाजन यांचं भाषण कृतघ्नताजनक आहे, अशी ''शाक्य" सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशिय संस्था, सोलापूर या संस्थेची भूमिका असून या कृतिचा निषेध नोंदवत महाजनांवर कारवाईची मागणी केलीय.
नाशिक येथील भारतीय प्रजाकसत्ताक दिनाच्या कार्यक्रमात, 26 जानेवारी रोजी नाशिक येथे राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांच्या संभाषणात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाचा उल्लेख अखेरपर्यंत टाळला. हा प्रकार निषेधार्ह तितकाच संतापजनक होता.
त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या वनरक्षक कर्मचारी माधवी जाधव यांनी त्याच मंचावर जाऊन महाजनांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्याचबरोबर भारतीय संविधानाचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. या घटनेवर सामाजिक माध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान भारत देशाला अर्पण केले. 26 जानेवारी 1950 रोजीपासून त्याच संविधानानुसार भारत देशाचा कारभार लोकशाही पध्दतीने सुरु झाला आहे, हे मंत्री गिरीष महाजन यांना चांगल्या प्रकारे ज्ञात असूनही त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रजासत्ताकाच्या दिवशी ऋण व्यक्त केले नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असताना सुध्दा महाजन यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव घेण्याचं सहेतुकपणे टाळलं असल्याचं दिसून येतं. भारतीय संविधानात समतेला प्रथम स्थान आहे. समरसतेची संकल्पना संविधानानं तसुभरही मांडलेली नाही, हे ज्ञात असुनही महाजन समरसता या शब्दाची आठवण व उच्चारण जाणीवपूर्वक करतात, ते अक्षम्य कृती होती. अशी जनभावना होती.
वनरक्षक माधवी जाधव यांच्या व्यक्त होण्यानं या जनभावनेची वाट मोकळी झाली. राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांच्या वक्तव्यात, डॉ. आंबेडकरांचा नामोल्लेख टाळणे, हा संविधानाच्या शिल्पकाराचा अवमानाचा होता, अशी भूमिका मांडत 'शाक्य" सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशिय संस्था, सोलापूर या सामाजिक संस्थेकडून जाहिर निषेध नोंदविताना, त्याच वेळी माधवी जाधव यांची पाठराखण करण्यात आलीय.
'शाक्य" सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशिय संस्था, सोलापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे कार्यालयात समक्ष भेटून निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनाची प्रत आपल्या मार्फतीने महाराष्ट्र शासनास पुढील कारवाईकरिता पाठवावी, असंही सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी "शाक्य" सामाजिक बहुउद्देशिय संस्था, सोलापूर यांच्या कडून करण्यात आलं आहे.
याप्रसंगी अध्यक्ष अगंद मुके, अशोककुमार दिलपाक, शेखर वाघमारे, गोपीचंद कांबळे, अशोक सोनवणे, अंबादास सोनवणे, व्यंकटेश सोनवणे, शशिकांत बाबरे, शांताराम वाघमारे, श्रीमंत गायकवाड, नागेश गायकवाड, श्रीमंत कोरे यांची उपस्थिती होती.
***
