पुणे : बहुभाषिक साहित्यामुळे महाराष्ट्र राज्य आता आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. बहुभाषिकाच्या एकत्र येऊन संमेलन साजरे होत असतात. ही परिषद अनेक भाषिक, विविध भाषिकांची मनं जोडण्याबरोबर राष्ट्रीय एकात्मतेला मजबूत करण्याचा महत्वाचं काम करीत आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ कवी बा. ह. मगदूम यांनी काढले.
"एकता, साहित्य, समाज व संस्कार यांचा संगम" हे ब्रीद घेऊन मराठी मातीतील ओलावा आणि इमानाची जोड लाभलेल्या शब्दांचा उत्सव अर्थातच '03 रे स्पंदन साहित्य संमेलन'. मराठी भाषेचा गोडवा आणि इस्लामिक विचारांची समृद्धता जपणारा सोहळा रविवारी,15 फेब्रुवारी रोजी कोंढवा खुर्द, डाॅ. अनिस चिश्ती- साहित्य नगर, वेलकम हाॅल इथं मोठ्या उत्साहात पार पडला.
स्पंदन बहुभाषिक साहित्य मंडळाच्या वतीने बहुभाषिक साहित्य संमेलनात विविध पुस्तक प्रकाशन, पुरस्कार प्रदान, काव्य संमेलन, पारितोषिक वितरण अशा विविध कार्यक्रमाच्या रेलचेलीत मोठ्या थाटाने पार पडलेल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी बा. ह. मगदूम होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
स्पंदन परिषदेचे संस्थापक इंतेखाब फराश यांनी सर्वांचे स्वागत केले, कवियत्री अनिसा सिकंदर शेख यांनी प्रास्ताविक करत उद्देश स्पष्ट केले. स्वागताध्यक्षा महेमूदा शेख यांनी सर्व साहित्यिकांचे स्वागत केलं. 
यानंतर रोपट्याला जल अर्पण करून प्राचार्य इ. जा. तांबोळी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार खलील खान, अनिस कुट्टी, अय्यूब अहमद नल्लामंदू यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते इंतेखाब फराश संपादित " टिफीन बॉक्स " व दिनकर लाकडे लिखित " फातीमा शैख " हे पुस्तक प्रकाशन करत, ज्येष्ठ कवी मुबारक शेख , प्रा. बी. एच. करजगीकर, एजाज चिनीवार, तब्बसुम शेख, प्रा. युसूफ शेख यांना " फख्रे मिल्लत जीवन गौरव " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अनिस कुट्टी, सदानंद माळी, बा. ह. मगदूम, प्रा. तांबोळी, नल्लामंदू यांनी साहित्याच्या विविध पहलूवर विचार मांडत मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले.
संमेलनाच्या अखेरच्या सत्रात सायरा बानू चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींच कवी संमेलन झाले. सूत्रसंचालन बशीर काजी यांनी केलं तर गौस पाशा शेख यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मुस्लीम कबीर, जाफर बांगी, शकील जाफर मंचर, तहसीन सय्यद, सदानंदन माळी, दत्ता वालेकर, साईनाथ राहरटकर, शबाना गुलजार शेख, मोहंमद शकील, आशा नष्टे, संगीता लाड आदी उपस्थित होते.
