अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो 2026 च्या अधिकृत लोगोचे अनावरण

shivrajya patra


सोलापूर : “पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे प्रदर्शन देशातील उत्कृष्ट जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान अनुभवता येईल, असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले. 

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शुक्रवारी, 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो 2026 या भव्य प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे अनावरण बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (जिल्हा परिषद, सोलापूर) यांच्या हस्ते जिल्हा परिषद, सोलापूर येथील त्यांच्या दालनात दिमाखात पार पडले. लोगो अनावरण प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा उपआयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) अनिल सर्जेराव तांबे यांच्यासह विभागातील इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पशुपालन, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे, असं आवाहनही लोगो अनावरणानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी केले.

यावेळी प्रदर्शनाच्या मुख्य आकर्षणांबाबत माहिती देताना जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन यांनी सांगितले की, या प्रदर्शनात राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या व विविध पक्षी प्रजातींचे दर्शन घडणार आहे. यासोबतच आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन, दुग्ध प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. पशुधन आरोग्य, लसीकरण आणि वैज्ञानिक संगोपन या विषयांवर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.

लोगो अनावरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समित्या व सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्सद्वारे जनजागृती केली जाणार आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी व नागरिकांनी या भव्य पशुधन महोत्सवात सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, सोलापूर डॉ. अनिल सर्जेराव तांबे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

To Top