सालाबादप्रमाणे ज्या महिन्याची जगभरातील मुस्लिम बांधव आतुरतेने प्रतिक्षा करीत असतात त्या यावर्षीच्या रमजान मासा ला आजपासून प्रारंभ झाला आहे. काल बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतरच रमजान ची एक तारीख आणि इस्लामी जगातील सर्व लोकांचे दैनंदिन जीवन बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. भक्ती (इबादत) चा महिना म्हणून रमजान महिन्याची गणना केली जाते.
हजरत पैगंबरांनी या महिन्याला अल्लाहचा महिना म्हणून संबोधले आहे. यावरून या महिन्याची महती लक्षात येते. रोजा, नमाज, तरावीह, तिलावत, जकात, दानधर्म या सर्व गोष्टींचे पालन करून पूर्ण महिना अल्लाहच्या नामस्मरणाने घराघरातील वातावरण मुग्ध झालेले असते.
प्रत्येक जण जास्तीत जास्त ईश्वर आराधना करून वर्षभरातील स्वतःच्या चुकांचे पापक्षालन आणि अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी दाखवलेले सर्व सत्मार्ग अवलंबिले जातात. रोजेदाराच्या रोजाचे परिमाण पुण्य रुपात किती द्यावे, याची जबाबदारी साक्षात अल्लाहने घेतलेली असल्यामुळे प्रत्येक जण रोजे धरून त्याला प्रसन्न करण्यासाठी आतुर असतो.
त्यासाठी 14 ते 15 तास उन्हाची किंवा उष्णतेची पर्वा न करता केवळ अल्लाहची भीती मनात ठेऊन रोजे धरले जातात. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो.
रमजान महिन्यात केले जाणारे रोजे अर्थात उपवास हा जगभरामध्ये संशोधनाचा विषय राहिला आहे. रोजामुळे शरीरामध्ये जे काही बदल होतात. त्याने शरीराची आरोग्य अवस्था सुदृढ राहते, असं वैज्ञानिकांनी देखील सिद्ध केले आहे.
कॅन्सरसारख्या अत्यंत गंभीर आजारापासून सुटका करण्याचे काम रोजे करतात. संपूर्ण शरीरातील अंतरक्रियेची स्वच्छता रोजांमुळे होते, अशी अनेक वैज्ञानिक कारणे सुद्धा यामध्ये आहेत.
आधुनिक विज्ञानाने देखील रोजाचे महत्त्व विशद केले आहे. त्यामुळे रमजान महिना धार्मिक संस्कारासोबतच वैज्ञानिक अनुभूती देणारा आहे.
दिवसभर केवळ उपाशी राहणे म्हणजे रोजा नव्हे तर त्यासाठी अनेक प्रकारची स्वयंनिर्धारित बंधने आहेत.सर्वांचे पालन करून पवित्र रमजान महिना पूर्ण करायचा असतो.पवित्र रमजानच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... ! (क्रमशः)
सलीमखान पठाण,
9226408082
