उपक्रमामुळे परिसरात अभ्यासाचे आणि शिस्तीचे सकारात्मक वातावरण निर्माण
मोहोळ : तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमाला भीमनगर परिसरातील मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या उपक्रमामुळे परिसरात अभ्यासाचे आणि शिस्तीचे सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे.
नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी मुलांना मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरापासून दूर राहून अभ्यासाला वेळ द्यावा, असं आवाहन केलं होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत भीमनगरातील मुलांनी दररोज सायंकाळी 07 ते 09 या वेळेत मोबाईल-टीव्ही न वापरता एकत्र बसून अभ्यास करण्याचा निर्धार केला आहे.
या वेळेत मुले वही-पुस्तके घेऊन सामुहिक अभ्यास करत असून, लेखनाचा सराव, धड्यांची उजळणी आणि एकमेकांना मदत करत अभ्यास करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे हा उपक्रम स्वयंस्फूर्तीने सुरू असल्याने पालकांमधूनही समाधान व्यक्त केलं जात आहे.
चौकट :
भीमनगरमधील विद्यार्थ्यांना निर्णय निश्चितच प्रेरणादायी
“आजच्या डिजिटल युगात मुलांनी मोबाईल-टीव्हीपेक्षा शिक्षणाला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. भीमनगरातील विद्यार्थ्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच प्रेरणादायी असून, अशीच अभ्यासाची सवय लागली तर हीच मुले उद्याचे सक्षम व सुजाण नागरिक बनतील.”
आज मोबाईलच्या वाढत्या आकर्षणामुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असताना, भीमनगरातील मुलांचा हा उपक्रम इतर भागांसाठी आदर्श ठरत आहे. नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत केवळ विकासकामांपुरती मर्यादित न राहता भावी पिढीच्या शैक्षणिक विकासासाठीही कटिबद्ध असल्याचे चित्र या उपक्रमातून स्पष्ट होत आहे.
प्राजक्ता पाटील,
नगराध्यक्षा, नगरपंचायत अनगर.
