अल्पसंख्य उमेदवारांच्या माफक अपेक्षांना युतीच्या घोषणेने सुरूंग; सेनेच्या कार्यकर्त्यांतही संभ्रमावस्था

shivrajya patra

सोलापूर : सामाजिक हितासाठी पर्यायाच्या शोधात असलेल्या मुस्लिम समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी गतवर्षात शिवसेना (एकनाथ शिंदे) मध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या माध्यमातून न्याय मिळेल, समाजाला योग्य प्रतिनिधित्व दिलं जाईल, अशी अल्पसंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा होती. आता शिवसेना पक्षातील मुस्लिम समाजाचा वाढता सहभाग स्थानिक नेतृत्वात अस्वस्थता अजून नेतृत्वाच्या सोयीच्या 'युती' मुळं सुरुंग लागला असून कार्यकर्त्यांतही संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र आता उघडपणे समोर येत आहे.

निवडणुकांचं पडघम वाजू लागलं की, इच्छुकांची निवडणूक लढविण्याची इच्छा प्रबळ होते, तद्वतच  सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मुस्लिम समाजातून जवळपास 15-20 इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली होती.

त्यात स्थानिक नेतृत्वानं केवळ एका मुस्लिम उमेदवाराला संधी देत उर्वरित सर्व इच्छुक उमेदवारांना कात्री लावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिवसेनेने मुस्लिम समाजातील उदयोन्मुख नेतृत्वाला जवळ घेतलं, मात्र उमेदवारी देताना संपूर्णपणे डावलल्याची भावना कार्यकर्त्यांत तीव्रतेने पसरलीय.

त्यात भरीत भर म्हणून शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवकाळी युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं कारण असल्याचं दिसतंय, महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत स्थानिक राजकीय पटलावरची समीकरणे पदो-पदी बदलत चालली आहेत. सध्या होत असलेली मोठ्या प्रमाणावरची ढवळाढवळ अन् उलथापालथी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

विशेषतः निवडणुकीच्या धामधुमीत अचानक जाहीर झालेल्या युतीमुळे विविध पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संभ्रम व नाराजी निर्माण झाली, त्याचा सर्वाधिक फटका अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला बसत असल्याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गेल्या अनेक दशकांपासून सोलापूर शहरातील अल्पसंख्य मुस्लिम समाजाचा पारंपरिक मतदार काँग्रेस पक्षाशी जोडलेला होता. मात्र, काँग्रेसकडून अपेक्षित न्याय, विकास व योग्य राजकीय प्रतिनिधित्व न मिळाल्याच्या भावनेतून मुस्लिम समाजातील कार्यकर्ते काँग्रेसपासून हळूहळू दूर गेला. त्यानंतर पर्याय म्हणून समाजातला राजकीय आकांक्षा असलेला वर्ग 'कौम' चा पक्ष म्हणून एआयएमआयएम पक्षाकडं झुकत गेला, प्रारंभी पक्षाला उल्लेखनिय यश मिळालं.

तत्कालिन स्थानिक नेतृत्व आणि पक्ष कार्यकर्त्यांही अपेक्षा उंचावल्या. एआयएमआयएम पक्षावर भाजपाची B टीम असाही प्रचार विरोधकांकडून झाला, मात्र एआयएमआयएम पक्षाचे स्थानिक नेतृत्व आणि नगरसेवक मतांचा उपयोग करून घेतला जात असून मुस्लिम समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याची खदखद जन्माला आली. या खदखदीला वाट मोकळी करून देण्यासाठी आपल्या सामाजिक समस्यांची सोडवणूक करू पाहणाऱ्या पक्षाचा पर्याय म्हणून असंतुष्ट कार्यकर्ते विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडं खेचले जाऊ लागले.

राजकीय रणसमरांगणात पक्ष तत्वाला कोणत्या क्षणी मूठमाती देत नेतृत्व कधी कोणाशी हस्तांदोलन करुन युतीची घोषणा करतील, याचा नेम राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्यात झालेली युती मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांसाठी घातक ठरत असल्याची चर्चा आहे. 

“मुस्लिमबहुल भागांमध्ये शिवसेनेला मते मिळत नाहीत” या अपप्रचारातून शिवसेनेच्या काही नेत्यांनी मुस्लिमबहुल प्रभागांतील उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. हे राजकीय गणित मुस्लिम समाजाला विश्वासात न घेता ठरविण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 17 या भागांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असतानाही या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्या. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वर्षे काम करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना बळावली आहे. शिवसेनेत मुस्लिम कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरताच वापर करण्यात येतोय की काय, अशी उघड चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष उमेदवारांची घोषणा करताना अल्पसंख्य मुस्लिम समाजाला डावलतो, असं बोललं जातं. मात्र, या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून मुस्लिम समाजातील उमेदवाराला संधी दिल्याचे चित्र समोर आले आहे. 

ज्या पक्षाकडे मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेने कमी आहे, त्या पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना संधी दिली; मात्र ज्या शिवसेनेकडे मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्या पक्षाने केवळ एकाच जागेवर मुस्लिम उमेदवार देणे, हा मुस्लिम समाजावर अन्याय असल्याची भावना अधिक तीव्र होत आहे. त्यातही भाव-भावनांचा वापर करून राजकीय स्वार्थ साधला जात असल्याची जाणीव मुस्लिम समाजाला हळूहळू होऊ लागली आहे.

शिवसेनेच्या अंतर्गत बैठकीनंतर कार्यकर्त्यांची समजूत काढताना “मुस्लिमबहुल भागांमध्ये शिवसेनेला मते मिळत नाहीत, म्हणून त्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्या” असे वक्तव्य करण्यात आल्याचं चर्चिलं गेलं आहे. तसेच, मुस्लिम नगरसेवक निवडून आल्यानंतर पक्षातील स्थानिक राजकीय समीकरणे बदलतील व आपले वर्चस्व कमी होईल, या भीतीपोटीही उमेदवारी देण्यात आली नसल्याची चर्चा सोलापूर शहरात जोर धरीत आहे.

एकूणच, यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या युती, उमेदवारी वाटप आणि राजकीय निर्णयांमुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून, या असंतोषाचा थेट परिणाम आगामी निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं जनमाणसांतून बोललं जातं आहे.

To Top