काल बुधवारी सकाळी अजित दादांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी ऐकली.मन सुन्न झाले. पाच वर्षांपूर्वी अजितदादांची झालेली भेट, त्यांच्याशी झालेली चर्चा, त्यांचा हजरजबाबीपणा या आठवणीने गहिवरून आले.
11 फेब्रुवारी 2020... अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन तर्फे दोन पुरस्कार मिळाले होते. एक होता सर्वात कमी एनपीए असलेली बँक आणि दुसरा होता हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेली बँक. त्यावर्षी हे दोन पुरस्कार मिळवणारी आपली शिक्षक बँक एकमेव होती.
हा पुरस्कार वितरण सोहळा रवींद्र नाट्य मंदिर दादर येथे होणार होता. उपस्थितीसाठी संख्येची मर्यादा असल्याने शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांचे नेतृत्वाखाली तत्कालीन बँकेचे चेअरमन संतोष दुसुंगे, व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख, शताब्दी समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण, संचालक अवि निंभोरे, बँकेचे एमडी अरुण देशमुख साहेब असे सहा जण आम्ही पुरस्कार घेण्यासाठी गेलो होतो. सकाळी साडेनऊ वाजता आम्ही रवींद्र नाट्य मंदिर येथे पोहोचलो. तेथे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन कै. उदय शेळके यांची भेट झाली. त्यांनी अजितदादा येथे आलेले असल्याचे सांगितले.
त्यावेळी अजित दादा शेजारी भूविकास बँकेच्या कार्यालयात उपस्थित होते. आपल्या शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवाची सांगता त्यांच्या उपस्थितीत व्हावी, म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण देण्यासाठी मंत्रालयात जाणारच होतो. योगायोगाने दादांची तेथे भेट झाली.
अतिशय निवांत वातावरणात आमची चर्चा झाली. आम्ही त्यांना भेटण्यासाठी केबिनमध्ये गेलो. त्यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब त्या ठिकाणी दादांच्या भेटीला आलेले होते. दादांनी आम्हाला सांगितले की, ज्येष्ठ नेते जोशी साहेब आलेले आहेत, त्यांच्याशी बोलतो आणि नंतर आपण चर्चा करू. त्याप्रमाणे जोशी साहेब गेल्यानंतर आम्हाला आत बोलवण्यात आले.
बापूसाहेबांनी बँकेची माहिती शताब्दी समितीचा अध्यक्ष म्हणून मी दादांना द्यावी, असे सुचवले. त्याप्रमाणे दादांच्या शेजारी बसून मी त्यांना बँकेची सर्व माहिती दिली. विशेषतः कुटुंब आधार निधी आणि मयत कर्ज निवारण निधीची योजना ऐकल्यानंतर दादा खूपच प्रभावित झाले. शताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आपल्या उपस्थित करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.
या कार्यक्रमात बँकेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान आपल्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच सर्व सभासदांना घड्याळ भेट म्हणून देण्यात येणार आहे, असे मी सांगताच दादांनी अहो घड्याळ आपल्या पक्षाचे चिन्ह आहे. त्यामुळे तुम्ही मला बोलवता की काय आणि माझ्या हस्ते घड्याळ वाटता म्हणजे पक्षाचा प्रचार केल्यासारखे होईल, असे मिश्किलपणे सांगितले. सध्या मी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी करीत आहे. त्यामुळे या महिन्यात माझा राज्यात कुठेही दौरा नाही.
पुढील मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.अधिवेशन संपल्यानंतर जो पहिला रविवार येईल, ती तारीख तुम्हाला देतो, असे सांगून त्यांनी त्यांच्या पीएला अधिवेशन संपताच येणाऱ्या रविवारची तारीख नगरसाठी राखीव करण्याचे सांगितले.
अतिशय प्रसन्न वातावरणात आम्ही तिथे निघालो आणि शेजारी रवींद्र नाट्य मंदिरात पुरस्कार घेण्यासाठी येऊन बसलो. तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना साताऱ्याहून मुंबईत येण्यास उशीर झाल्याने कार्यक्रम जवळपास एक तास उशीर सुरू झाला. परंतु तोपर्यंत दादा त्या ठिकाणीच होते आणि राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत होते.
पुरस्कार समारंभ सुरू झाला. निकषाप्रमाणे पुरस्कारचे वितरण केले जात होते. पहिल्या निकषाप्रमाणे सर्वात कमी एनपीए असलेली बँक म्हणून एक पुरस्कार आम्ही स्वीकारला आणि पुन्हा आपल्या जागी येऊन बसलो.
त्यानंतर दुसऱ्या वेळी एक हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेली बँक म्हणून आपल्या जिल्हा शिक्षक बँकेचा गौरव होत असताना पुरस्कार घेण्यासाठी आम्ही दुसऱ्यांदा व्यासपीठावर गेलो. त्यावेळी मी दादांना सांगितले की, दोन पुरस्कार मिळवणारी या वर्षातील आमची शिक्षक बँक एकमेव आहे. त्यावर अत्यंत मिश्किलपणे दादांनी... म्हणून तर तुम्हाला मी वेळ दिली आहे. तुमची बँक खरोखर अतिशय चांगली आहे, असे उद्गार काढले.
त्यांच्या या हजर जबाबीपणाचा सर्वांनाच अभिमान वाटला. दादांनी आमच्या सर्व संचालकांसोबत फोटोसेशन केले आणि पुरस्कार घेऊन प्रसन्न मनाने आम्ही व्यासपीठावरून खाली उतरलो.
काल सकाळी दादा गेल्याची वार्ता कळाल्यानंतर या सर्व आठवणी उचंबळून आल्या आणि संपूर्ण दिवस दादांच्या आठवणीतच व्यतीत झाला.
अजित दादांनी खरोखर एक सक्षम नेतृत्व राज्याला दिले. विकासाची जाण असलेले नेतृत्व असे अकाली निघून जाईल, असे कोणालाही वाटले नसेल. अत्यंत उमेदीच्या काळात अचानकपणे दादांची एक्झिट झाली ही खरोखर अत्यंत मनाला क्लेषदायक अशी बाब आहे.
शेतीमध्ये दादाचा खूप जीव होता.त्यांनी स्वतःची शेती अत्यंत आधुनिक पद्धतीने केलेली आहे. बारामतीला जाऊन येणारे अनेक लोक त्यांच्या शेतीची प्रशंसा करतात.वेळेचा काटेकोरपणा पाळणारे,सकाळी सहा वाजता सुद्धा मंत्रालयीन पातळीवर अधिकाऱ्यांच्या बैठका लावणारे, ग्रामीण भागातील जनतेची नाळ ओळखणारे, अतिशय निर्भीडपणे आपले मत व्यक्त करणारे, शब्द कठोर असले तरी मन अतिशय प्रेमळ असणारे अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत, ही कल्पनाच करवत नाही.
त्यांच्या या अचानक जाण्यामुळे राज्याचे अतोनात असे नुकसान झालेले आहे. तसेच त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्राताई दोन्ही मुले आणि संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे.त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना द्यावी हीच ईश्वरा जवळ प्रार्थना !
दादांच्या आता फक्त आठवणी उरल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी निरोप घेतला, त्याबद्दल एवढेच सांगावेसे वाटते की -
रहने को तो इस दहेर मे आता नही कोई
तुम जैसे गये ऐसे भी जाता नही कोई.
सलीमखान पठाण,
माजी चेअरमन तथा अध्यक्ष,
बँक शताब्दी समिती, अहमदनगर (अहिल्यानगर)
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक.
9226408082
