माघ यात्रेसाठी अंदाजे 03 ते 04 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होणार असल्याने गर्दी व्यवस्थापन व अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार पुढील कृतीस मनाई करण्यात येत आहे.
🔶 श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा ते श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदिर परिसर व पुढे महाद्वार चौक परिसर हा भाग दुचाकी, चारचाकी व इतर सर्व वाहन चालवणे तसेच पार्किंग करणे.
🔷 मंदिर परिसरात छोट्या छोट्या अरुंद रस्त्यावर वाहने लावणे.
या आदेशातून खालील वाहनास सूट देणेत येत आहे.
🔶 शासकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, मंदीर परीसरात राहणारे, मंदीरात कामकाज करणारे व्यक्तींचे वाहनांसाठी पोलीस प्रशासनाकडून पास प्राप्त झालेनंतर सदरच्या आदेशातून सूट राहील. तथापि, शासकीय कर्तव्य, मंदीरातील कर्तव्य याशिवाय इतर बाबीसाठी शासकीय व मंदीर समितीचे वाहन, कर्मचारी वाहन याचा वापर केला जाणार नाही, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
🔷 या कालावधीमध्ये याठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या वाहनाची पार्कंग व्यवस्था पंढरपूर नगर परीषदेमार्फत करणेत यावी. सर्व गल्ली बोळातून दुचाकी येणार नाही, यासाठी नगर परीषद यांनी बॅरीकेड्स लावणेत यावेत. याबाबत नगरपरीषदेने व्यापक प्रसिध्दी द्यावी.
🔶 मंदिर परीसरात राहणारे, कामकाज करणारे व्यक्तींकरीता नमुद कालावधीसाठी पास देण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाने करावी. पासधारक व्यक्तींना त्यांच्या वैयक्तीक कारणासाठी मुभा राहणार नाही, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
🔷 मंदिर समिती कर्मचारी व पोलीस कर्मचारी पास घेतील व त्यांना ठरवून दिलेल्या जागेतच वाहन पार्कीग करतील.
🔶 मंदिर परिसरात व्यवसाय करणारे व्यावसायिकांचे मालाची ने-आण करण्याकामी पोलीस प्रशासन यांनी त्यांचेशी चर्चा करुन भाविकांची गैरसोय होणार नाही, अशी ठराविक वेळ निश्चीत करुन त्यादरम्यान अशी वाहतूक होईल, याची खबरदारी घ्यावी.
🔷 महत्वाचे तसेच राजशिष्टाचार पात्र व्यक्तींसाठी तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीने श्रीकृष्ण मंदीर, चौफाळ्यापासून ने-आण करण्याकामी पर्यावरणपूरक वाहनांची व्यवस्था करावी.
🔶 पंढरपूर शहर पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणेचे दृष्टीने योग्य ती कार्यवाही करणेत यावी. तसेच आदेशाचा भंग करणारे यांचेविरुध्द आदेशात नमूद कायद्यान्वये कारवाई करणेत यावी. त्या अनुषंगाने वाहन प्रतिबंध क्षेत्रामध्ये अनाधिकृतपणे वावरणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करुन सदर वाहने पोलीस स्टेशन पंढरपूर येथे दंडात्मक कारवाईसाठी जमा करण्यात यावी. तसेच सदर वाहनावर मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार मोठ्या रक्कमेची दंडात्मक कारवाई अनुसरण्यात यावी. ही रक्कम वाहनधारकांकडून रोखीने वसुल करण्यात यावी. दंडात्मक कारवाईची संपूर्ण रक्कम वसूल झाल्याशिवाय ते वाहन कार्यमुक्त करण्यात येऊ नये. दंडात्मक रक्कमेची वसूली केलेल्या वाहनांची माहिती (अहवाल) तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी पंढरपूर यांचेकडे दर सोमवारी सादर करण्यात यावा.
या आदेशाचे उल्लंघन झालेस उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 अन्वये कारवाईस पात्र राहिल, असं जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशीर्वाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविलं आहे.
