सोलापूर : एनसीसी अधिकारी प्रा. डॉ. गौस अहमद शेख हे अध्यापन सेवेसोबतच एनसीसी सेवाही उत्तम प्रकारे बजावत आहेत. ते एनसीसीच्या माध्यमातून मोठ्या शिस्तीने बैठका आयोजित करतात. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल जागरूकता आणि विशेषतः कॅडेट्सना आत्मविश्वास आणि साहस देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांची मेजर या उच्च पदावर बढती गौरवास्पद आहे, असे कर्नल रणधीर सतीश यांनी म्हटले.
सोलापूर सोशल असोसिएशन कला आणि वाणिज्य महाविद्यालय सोलापूर, उर्दू विभागाचे उपविभाग प्रमुख आणि एनसीसी विभागाचे कॅप्टन प्रा. डॉ. गौस अहमद शेख यांना डीजी एनसीसी, नवी दिल्ली यांनी "मेजर" या उच्च पदावर बढती दिली. ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर रणधीर सतीश आणि लेफ्टनंट कर्नल शरब बाबर यांनी त्यांना मेजर पद प्रदान केले. याप्रसंगी कर्नल रणधीर सतीश बोलत होते.
कार्यक्रमात सुभेदार मेजर कृष्णा प्रसाद सबकोटा, सुभेदार यू.एन. शाहू, सुभेदार प्रदीप कदम, सुभेदार गोरख नाथ, नाईक सुभेदार महेश बी, बीएचएम गोपीनाथ बोडके, सर्व सीएचएम व सर्व हवालदार आणि सोशल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. इक्बाल तांबोळी, प्रा. डॉ. जैनुद्दीन मुल्ला यांनीही प्रा. डॉ. गौस अहमद शेख यांच्या बढतीप्रित्यर्थ त्यांचं अभिनंदन केले.
एनसीसी ही आपल्या देशातील एकमेव संघटना आहे, ज्याने गणवेशात स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज एनसीसी कॅडेट्सची संख्या वीस लाख आहे. असं सांगून कर्नल रणधीर सतीश पुढं म्हणाले, या संघटनेच्या माध्यमातून तरुणांना देशाप्रती निष्ठा, देशप्रेम, देशासाठी बलिदान तसेच एकता आणि सौहार्द, देशात शांती आणि बंधुता, देशभक्ती आणि परोपकार या भावना शिकवल्या जातात. 
दरवर्षी विविध एनसीसी शिबिरे आयोजित केली जातात. कॅडेट्सच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. आज एनसीसी कॅडेट्स भारतात राष्ट्रीय एकता आणि परोपकारासाठी अनुकरणीय भूमिका बजावत आहेत, त्यात डॉ. गौस अहमद शेख यांची मेजर पदी बढती अभिनंदनीय असल्याचेही कर्नल रणधीर सतीश यांनी शेवटी सांगितले.
09 महाराष्ट्र बटालियनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. गौस अहमद शेख यांचं अभिनंदन केले. डॉ. गौस अहमद शेख गेल्या पंधरा वर्षांपासून एनसीसी अधिकारी म्हणून सोशल महाविद्यालयात आपली सेवा बजावत आहेत. सोलापूरच्या सर्व उर्दू प्रेमींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
