वृध्द पित्याची हत्या; मुलाविरूध्द गुन्हा दाखल

shivrajya patra

 

सोलापूर : दैनंदिन देखभालीस कंटाळलेल्या मुलानं लोखंडी पाईपने मारहाण करून वृध्द पित्याची हत्या केली. ही खळबळजनक घटना जुना विडी घरकुल परिसरातील न्यू शिवाजी नगर गोंधळी वस्तीत मंगळवारी रात्री घडली. नंदकुमार गायकवाड असं मृताचं नांव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आईच्या फिर्यादीनुसार मुलगा आरोपी मनोज नंदकुमार गायकवाड याच्याविरूध्द बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गोंधळी वस्तीत राहत्या ठिकाणी  मुलगा मनोज याने वडील नंदकुमार यांचे खाणे-पिणे, शौचालय-बाथरुम, त्यांची देखभाल आणि सायंकाळी स्वयंपाक करण्याच्या कारणावरुन वडील नंदकुमार यांच्यासोबत कडाक्याचे भांडण केले. 

या भांडणात चिडून जाऊन घरात असलेल्या लोखंडी पाईपाने वडीलाच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर व अवघड जागेचे ठिकाणी लोखंडी पाईपाने मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. हा प्रकार मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी मृताची पत्नी तथा मुलाची आई अरुणा नंदकुमार गायकवाड (वय ६० वर्षे, रा. घर नं. ५१, भारत नगर, कुमठा नाका, सोलापूर) हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

त्यानुसार फिर्यादीचा मुलगा मनोज नंदकुमार गायकवाड (रा. ३८, न्यु शिवाजी नगर, गोंधळे वस्ती, जुना विडी घरकुल, सोलापूर) याच्याविरुद्ध भा. न्या. संहिता क १०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि मोरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. 

To Top