दक्षिण सोलापूर : पंचायत समिती निंबर्गी गण हे माझ्यासाठी हक्काचं माहेरघर असून या गणातून मी निवडणूक लढवणार आहे. राजकीय रण मैदानात पक्षाइतकाच सामाजिक 'ताना-बाना' अन् विचारधारेला महत्व असतं, अशा समतावादी विचारधारेच्या पक्षाकडून रिंगणात उतरण्याचे नाही तर जिंकण्याच्या तयारीनं राजकीय रणमैदानात उतरणार असल्याचा निर्धार श्रुती गायगवळी यांनी शनिवारी व्यक्त केला.
दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकीय पटलावर आजवर वळसंग, बोरामणी, मुस्ती आणि मंद्रुपला राजकारण आणि समाजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पाहिलंय. निंबर्गी गणातून २०१७ च्या पंचायत समिती निवडणुकीत श्रुती गायगवळी यांचे पती चंद्रशेखर गायगवळी यांच्या कुटुंबाला कोणताही राजकीय वारसा नसताना बसपाकडून एकाकी झुंज देत १७५२ मते प्राप्त केली होती.
त्यावेळी चंद्रशेखर गायगवळी यांना निंबर्गी गणात १७५२ मते मिळवणे अर्थातच लक्षवेधी होतं, तो जनतेचा सार्थ विश्वास होता. तोच विश्वास पुन्हा मला मिळणार आहे, असा मला विश्वास असल्याचं निंबर्गी गणातील इच्छुक उमेदवार श्रुती गायगवळी यांनी म्हटलंय.
खरं तर कोणतेही पद महिलांसाठी राखीव झाल्यास महिलांना केवळ स्वाक्षरीपुरतं मर्यादित राहतं असं मानलं जातं, परंतु प्रत्यक्ष सामान्य जनतेची प्रश्नासाठी अहोरात्र झगडणारं कुटुंब अशी गायगवळी परिवाराची पंचक्रोशीत ओळख असल्यानं निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा संकल्प केला असल्याचं श्रुती गायगवळी यांनी म्हटलंय.
सन १९७० च्या दशकात टाकळीचे सुपुत्र मल्लिकार्जुन कलशेट्टी हे एस कॉंग्रेसकडून जिल्हा परिषदेत निवडून गेले होते. त्यानंतर आजपर्यंत अशी संधी टाकळीकरांना मिळालेली नाही. विजयकुमार दुधभाते यांनी २०१२ ला अपक्ष निवडणूक लढवली, त्यांनाही यश मिळाले नाही. 
२०१७ ला टाकळीकर माझ्या पाठीशी राहिले, मात्र आमचे प्रयत्न अपुरे पडले, अन्यथा टाकळीच नाव इतिहासात कोरले गेले असतं, असं टाकळीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी यावेळी म्हटलं आहे.
आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून ही संधी पुन्ह:श्च टाकळीकरांना चालून आली आहे. समस्त टाकळीकर व पंचक्रोशीच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे, असे समजून सूज्ञ मतदार श्रृती गायगवळी यांच्या पाठिशी उभं राहतील, असं जनसामान्यांतून बोललं जातंय.
