दहावी-बारावी वर्गावरील शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मिळावी सूट; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

shivrajya patra

सोलापूर : सध्या सर्व शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या इयत्ता 10 वी आणि 12 वी सराव परीक्षा सुरू आहेत. 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा व इयत्ता 10 वीची 02 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहेत. तसेच 04 फेब्रुवारी व 05 फेब्रुवारी रोजी बऱ्याच शाळा, महाविद्यालयात या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता इयत्ता 10 वी व 12 वी वर्गावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना खात्री करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कर्तव्यातून सूट द्यावी. तसेच या इयत्तेवरील काही शाळेतील शिक्षकांना शिपाई सोडून इतर सर्वांना नेमणूक आदेश आलेले आहेत. त्यामुळे प्रशिक्षणाचे 02 दिवस आणि निवडणुकीचे 02 दिवस अशी 04 दिवस शाळा परीक्षेतील कालावधीत बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे लेखी हमीपत्र घेऊन त्यांची निवडणूक कर्तव्यातून सूट द्यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. 

जिल्हाधिकारी यांनी या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिली.

याप्रसंगी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड आदींची उपस्थिती होती. 

To Top