कासेगांव/पवार संतोष : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील छत्रपती क्रिकेट क्लब यांच्या वतीने बिरोबा वस्ती मैदानावर आयोजित छत्रपती क्रिकेट चषक-2026 या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत छत्रपती क्रिकेट टीम, कासेगांव संघाने अंतिम सामन्यात खर्डी संघावर मात करत विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात कासेगांव संघाने प्रथम फलंदाजी करत 08 षटकांत 143 धावा केल्या. यामध्ये आकाश चव्हाण याची शतकी खेळी निर्णायक ठरली. 144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खर्डी संघ 99 धावांत गारद झाला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक कासेगांव, द्वितीय खर्डी, तृतिय जामगाव तर बावी संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज आकाश चव्हाण, उत्कृष्ट गोलंदाज सचिन क्षीरसागर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रथमेश सातपुते यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गड्डू अण्णा पटणे यांच्या शुभहस्ते पार पडले. विजेत्या संघांसाठी बक्षीसाची रक्कम त्यांनीच देत आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद गट स्तरावरील नेतृत्वासाठी पटणे यांची सक्रियता वाढत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.
बक्षीस वितरण समारंभास महादेव वडजे, रवी चव्हाण,अरविंद ताटे, इस्माईल शेख, शंकर येणगुरे, रामहरी चौगुले, संजय जाधव, संभाजी चौगुले, अल्लाउद्दीन शेख, संतोष भोजणे, म्हाळप्पा गुड्ड, समीर शेख, श्याम हुडकर, रणजित चौगुले, प्रविण चौगुले, ओंकार येणगुरे, ज्ञानेश्वर कदम, सचिन उबाळे, चंद्रकांत चव्हाण यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेस क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी छत्रपती क्रिकेट क्लब व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
