सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये अवैध शस्त्र/अग्नीशस्त्राचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असतानाच, शहर पोलिसांकडील गुन्हे शाखेने लक्षवेधक कामगिरी रविवारी पार पाडलीय. अग्निशस्त्र विक्रीपूर्वीच तिघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. त्रिकुटाच्या 02 देशी बनावटीचे पिस्टल, 08 काडतुसे जप्त आणि मोटारसायकलसह 02,16,000 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय.
गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार संताजी रोकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार डी.आर.एम. रेल्वे ऑफिसचे बाजूस रेल्वे कॉलनीचे वॉल कंपाऊंड लगत मोकळ्या जागेत तिघे संशयित काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटार सायकलवर थांबले त्यांच्याकडं देशी बनावटीचे पिस्टल असल्याचे समजले. उभयतांनी ही माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना दिली. 
गुन्हे शाखेकडील स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक त्या ठिकाणी गेले. तेथे एक युनीकॉर्न मोटार सायकलवर 03 जण संशयास्पद स्थितीत थांबल्याचे दिसले. स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकाने तिघांना शिताफीने जागीच ताब्यात घेतले.
त्यांच्या अंगझडतीत राजा नुरजानसाब सौदागर याच्या कंबरेस डाव्या बाजूस पँटमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व खिशामध्ये ०५ काडतुसे मिळून आली, तर प्रदीप सुर्यकांत काळभोर याच्या कंबरेस डाव्या बाजूस पँटमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व खिशामध्ये ०३ काडतुसे मिळुन आली. त्या अग्नीशस्त्रासंबंधी परवान्याबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे तसेच दोन्ही पिस्टल व ०८ काडतुसे विक्री करण्याचे उद्देशाने आल्याचेही त्यांनी सांगितले.
त्या त्रिकुटाच्या ताब्यातून 02 देशी बनावटीचे पिस्टल व 08 काडतुसे व होंडा कंपनी युनिकॉर्न मोटार सायकल असा 02,16,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 03/25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजु मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष मुंडे, सिध्दाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतिश काटे, बाळू काळे यांनी पार पाडली.
... अशी आहेत आरोपींची नावे :
01) महंमदरफिक लालसाब जातगर ऊर्फ मनगोळी (वय-26 वर्ष, व्यवसाय- मजुरी रा. जातगर वस्ती, अलमेल, ता. सिंदगी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक)
02) राजा नुरजानसाब सौदागर (वय-26 वर्ष, व्यवसाय- बेरोजगार रा. वॉर्ड नंबर -09, भारत नगर, अलमेल, ता. सिंदगी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक)
03) प्रदीप सुर्यकांत काळभोर (वय-35 वर्ष, व्यवसाय- मेकॅनिक, रा.लोणी स्टेशनजवळ, कदम वस्ती, लोणी काळभोर, पुणे)
