सीमावर्ती चेक पोस्टवर एसीबीची कारवाई; मोटर वाहन निरीक्षक धुमाळसह दोघे ताब्यात

shivrajya patra

सोलापूर : राज्याच्या सीमावर्ती चेक पोस्टवर छत्रपती संभाजीनगर च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात ट्रेलर पास करण्यासाठी खाजगी इसमाकरवी मोटार वाहन निरीक्षकानं 2,500 रुपयाची लाच स्वीकारल्याचा प्रकार उजेडात आलाय. ही खळबळजनक घटना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी चेक पोस्ट इथं गुरुवारी घडलीय. मोटर वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ आणि खाजगी इसम अमोल पाटील अशी आरोपीतांची नावे आहेत. एसीबीच्या पथकाने उभयतांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आलंय.

तक्रारदाराने, 12 डिसेंबर रोजी मैहसाना येथून मी माल भरला असून 25 डिसेंबर रोजी नांदणी चेक पोस्ट पास करून अनंतपूर येथे जाणार आहे, तरी चेक पोस्टवरील मोटार वाहन निरीक्षक हे मला पैसे मागणी करण्याची शक्यता आहे .त्यांना पैसे देण्याची माझी इच्छा नाही, अशा आशयाची तक्रार बुधवारी, 24 डिसेंबर रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. 

यातील तक्रारदार हे मालवाहू ट्रेलरवर चालक असून ते त्यांचा ट्रेलर ने नेहमी गुजरात ते चेन्नई या दरम्यान माल वाहतूक करतात. या मार्गावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या नांदणी आरटीओ चेक पोस्टवर तिथं कर्तव्यावर असणारे मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ हे तक्रारदाराकडून यापूर्वी प्रत्येक वेळी 2,000 रुपयांप्रमाणे नेहमी घेत आले आहेत. पोलीस उप अधीक्षक बाळु जाधवर यांनी तक्रारीच्या पडताळणी केल्यावर त्यात सत्यता आढळल्यानं गुरुवारी, 25 डिसेंबर रोजी पंचासमक्ष सापळा कारवाई आजमावण्याचा प्रयत्न केला.

या सापळा कारवाईत मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ (नांदणी चेकपोस्ट, सोलापूर) यांच्या कक्षात तक्रारदार, गाडी पास करण्यासाठी परमिट घेऊन गेले असता, त्यांच्यासमोर त्यांच्या शेजारी बसलेले खाजगी इसम अमोल पाटील (रा.सोलापूर) यांनी तक्रारदाराकडं 03 हजार रुपयांची लाच रक्कमेची मागणी केली. त्यात तडजोडीअंती 2,500 रुपयांची लाच स्वीकारण्यास मूकसंमती दिल्याने मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांच्या समोरील टेबलचे ड्रॉवर मध्ये ठेवली असता, दोन्ही आरोपितांना सापळा पथकाने लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.

पोलिस अधिक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर), अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर) यांनी मार्गदर्शन अधिकारी, पर्यवेक्षण अधिकारी तसेच सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक बाळु जाधवर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना) तर सापळा पथकातील पोलीस हवालदार भालचंद्र बिनोरकर, पोलिस अंमलदार गणेश चेके,अमोल चेके, सांदिपान लहाने, शिवलिंग खुळे, मनोहर भुतेकर आणि गजानन कांबळे यांनी ही कामगिरी पार पाडली.

याप्रकरणी पोलिस उप अधीक्षक बाळू जाधवर (ला. प्र. वि. कार्यालय, जालना) यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केलीय. तत्पूर्वी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

फिर्यादीनुसार उभय आरोपींविरूध्द मंद्रुप पोलीस ठाण्यात कलम 07, 07 A आणि 12 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप अधीक्षक प्रशांत चौगुले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर) यांच्याकडं सोपविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

To Top