राज्यातील पहिलाच खटला... ! सासऱ्याच्या खून प्रकरणी जावई कारागृहात; घटस्फोटासाठी पत्नीची न्यायालयात धाव

shivrajya patra

सोलापूर : खूनाच्या प्रकरणात कारागृहात बंद असलेल्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा, यासाठी पत्नीनं नवऱ्याविरुध्द सोलापूर दिवाणी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच खटला आहे. 

27 एप्रिल, 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पत्नीस नांदायला पाठवत नसल्याच्या कारणावरुन सासुरवाडीत सासु-सासऱ्याच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये झोपलेले असताना आरोपीने उभयतांवर चाकूने हल्ला केला. त्यात सासऱ्याचा खून केला, तर सासु आणि मेव्हण्यावर चाकूने वार करुन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या आरोपात मोहोळ पोलिसांनी आरोपीला 27 एप्रिल रोजी अटक केली. तेंव्हापासून तो कारागृहात बंदीवासात आहे. 

गेल्या 04 वर्षांपूर्वी 2021 मध्ये त्यांचं लग्न झाले. लग्नानंतर नवऱ्याने माहेरवरुन पैसा घेऊन येण्याच्या कारणावरुन शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान उभयतांना 15 जुलै 2022 रोजी मुलगा झाला. सन २०२३ च्या दिवाळीला आई माहेरला नेण्यासाठी आली असताना तिला देखील नवऱ्याने मारहाण केली अन् सासू-पत्नीला घरातून हाकलून दिले. 

जानेवारी, 2024 मध्ये नवऱ्याने तिच्या माहेरला येऊन त्यांना मारहाण केली. त्यामुळे तिने नवऱ्याविरुध्द कौटूंबिक हिंसाचाराची केस केली.  बाळाचा ताबा मिळावा, म्हणून मोहोळ न्यायालयात अर्ज दाखल केला. कोर्टाने तो अर्ज मंजूर करुन बाळाचा ताबा पत्नीकडे द्यावा, असा आदेश दिला, तेव्हा नवरा बाळाला घेऊन कोर्टातून पळून गेला. 

27 एप्रिल, 2025 रोजी नवऱ्याने पत्नीच्या वडिलांचा अर्थात त्याच्या सासऱ्याचा खून केला. नवऱ्याने शारीरिक, मानसिक त्रास दिला व वडिलांचा खून केला, त्यामुळे नवऱ्याबरोबरचे नाते अस्तित्वात ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे नवऱ्यापासून आपल्याला घटस्फोट मिळावा, अशा आशयाचा घटस्फोट अर्ज पत्नीने सोलापूर दिवाणी न्यायालयात दाखल केला. 

याघटस्फोट अर्जाची सुनावणी न्यायाधिश संगिता वनकोरे यांच्या न्यायालयात होणार आहे. या प्रकरणी पत्नीतर्फे ॲड. अभय बिराजदार, ॲड. राहुल गायकवाड तर नवऱ्यातर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. मनोज गिरी काम पाहत आहेत. 

नवऱ्याने देखील बायकोविरुध्द तिने नांदण्यास यावे, म्हणून कौटूंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. तो दावा कौटूंबिक न्यायालयात प्रलंबित आहे.

To Top