25 ते 29 डिसेंबरदरम्यान श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन : श्री सिध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी

shivrajya patra

राज्यस्तरीय भव्य गुलाब पुष्प प्रदर्शन राहणार या प्रदर्शनाचे खास आकर्षण

सोलापूर : श्री सिध्देश्वर देवस्थान यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवलं जात आहे. या राज्यस्तरीय कृषी औद्योगिक आणि पशू-पक्षी प्रदर्शनाबरोबरच राज्यस्तरीय भव्य गुलाब पुष्प प्रदर्शन या प्रदर्शनाचे खास आकर्षण राहणार आहे. हे प्रदर्शन 25 ते 29 डिसेंबरदरम्यान होत असल्याची माहिती श्री सिध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सोमवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यंदा प्रदर्शनाचं 55 वं वर्ष आहे. प्रारंभी छोट्या स्वरूपात सुरू झालेले प्रदर्शन आता भव्य स्वरूपात होत आहे. आजवर लाखो शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देऊन शेतीविषयक बदलत्या प्रगत तंत्रज्ञानाला अनुभवलं आहे. 

यंदा होम मैदानावर 100x600 फूटाच्या एका छताखाली होत आहे.  प्रदर्शनात शेतीविषयक तीनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनात कृषी क्षेत्रासाठी AI तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी स्वतंत्र दालन असणार आहे, हेही या प्रदर्शनाचा वैशिष्ट्य असेल, असं अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्मार्ट एक्सपो ग्रुप च्या व्यवस्थापनांतर्गत कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने हे कृषी प्रदर्शन होत आहे. सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर व मोहोळ विभाग, रेशीम/खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण, राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवउद्योजक, कृषी यांत्रिकीकरण, फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्या सहभागाने आयोजित केले जात असल्याचे अध्यक्ष काडादी यांनी म्हटले.

भारतातील विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स व शेती अवजारे शेतकरी बांधवांना एकाच ठिकाणी पाहण्याची संधी हेही या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. वाहन महोत्सव, शेतीविषयक प्रक्रिया उद्योग, महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या, शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांची माहिती देणारी दालने, अवघ्या 10 मिनिटांमध्ये 01 एकर क्षेत्राची फवारणी करणारे रिमोट ऑपरेटेड ड्रोन चे लाईव्ह प्रात्यक्षिक व शेतकरी बांधवांना फवारणी क्षेत्रातील उद्योग करण्यासाठी उपयुक्त असा ड्रोन चे दालन, शेती विषयक विविध तंत्रज्ञानाची माहिती देणारी दालने, वर्टीकल गार्डन(Vertical Garden) व होम गार्डन (Home Garden) चे लाईव्ह प्रात्याक्षिक या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहे.

सेंद्रीय शेतीचे विशेष दालन, होम गार्डन किटचे लाईव्ह प्रात्यक्षिक, भाजीपाला रोपवाटिका व विविध दुर्मिळ अशा प्रजातींचे दालने, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे लाईव्ह प्रात्यक्षिक, दुर्मिळ देशी 500 हून अधिक बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री, तांदूळ महोत्सव, परदेशी भाजीपाला प्रदर्शन, सौर ऊर्जा विषयक दालने, पीक स्पर्धा, जगातील सर्वात लांब 15 इंच लांब गव्हाची लोम्बी व 140 त 150 दाणे त 100 व 8 इंच लांबीची लोम्बी कुदरत 17 ही देशी बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री, दुग्ध व्यवसायासाठीची विविध दालने, गोड्या पाण्यात मोत्यांची शेती संदर्भात माहिती, होम गार्डनकरीता व शेतीसाठी लागणारी नर्सरी व फळ रोपवाटिका प्रदर्शन, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमाल, बियाणे विक्रीसाठी मोफत स्टॉल, *जगातील सर्वात लांब 1000 केळी लागलेला घड*, फळ व विविध भाजीपाला प्रदर्शन, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन ही दालने प्रदर्शनाचं आकर्षण ठरणारी आहेत, या कृषि प्रदर्शनास नाममात्र 10 रुपये प्रवेश शुल्क असणार आहे, शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,  असं आवाहनही अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी शेवटी केलं आहे.

या पत्रकार परिषदेस श्री सिध्देश्वर पंच कमिठीतील सुरेश म्हेत्रे, विलास कारभारी, पशुपती माशाळ, तम्मा मसरे, नीलकंठप्पा कोनापुरे, विश्वनाथ लब्बा, गुरुराज माळगे आणि आत्मा चे विजयकुमार बरबडे उपस्थित होते.

============

..... ठळक ......

➤ स्थळ: होम मैदान, सोलापूर.

➤ दिनांक: 25 ते 29 डिसेंबर 2025.

➤ वेळ : सकाळी 10 ते रात्री 09 वाजेपर्यंत,

➤ शुक्रवारी, 26 डिसेंबर 

सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत गाय, बैल, वासरू, म्हैस अशा विविध पशु प्रजाती तसेच देशी गोवंश मधील विविध प्रजाती चे भव्य प्रदर्शन व स्पर्धा.

➤ शनिवारी, 27 डिसेंबर 

सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत 35 हून अधिक विविध देशी व विदेशी प्रजातींच्या श्वानांचे प्रदर्शन (डॉग-शो) व स्पर्धा, तसेच याचदिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 पर्यंत पुष्प रचना स्पर्धा. 

पुष्प रचना स्पर्धा साठी नोंदणी संपर्क : 8975891719/9370501791

➤ रविवारी, 28 डिसेंबर 

सकाळी 10.00 ते सायंकाळी 3.00 पर्यंत विविध प्रकारचे पाळीव मांजरांचे प्रदर्शन व स्पर्धा.

डॉग आणि कॅट शो स्पर्धेत नोंदणी साठी संपर्कः

9970992145/7849055759

खास आकर्षण रोझ क्लब सोलापूर यांचे विशेष सहकार्यातून भव्य राज्यस्तरीय 500 हून अधिक विविध गुलाब पुष्प एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्ण संधी.

➤ स्टॉल बुकींग व अधिक माहितीकरीता संपर्क : 8530017999

============

To Top