सोलापूर : पोलीस आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्याने शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील 03 सराईत गुन्हेगाराविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केलीय. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, शहरातील सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं होतं, असं शहर पोलिसांचं आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची कारवाई मानली जातेय.
मिथुन धनसिंग राठोड (वय- 33 वर्षे रा. घोडतांडा, द. सोलापूर) याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच आसपासच्या परिसरात स्वतःच्या फायद्या करिता हातभट्टी दारूचा व्यवसाय चालविल्याचे पोलिसांच्या दप्तरी असून त्याच्याविरुद्ध हातभट्टी दारूची वाहतूक, पुरवठा आणि विक्रीचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्याकडून स्थानबद्धतेचा प्रस्ताव आला होता. त्याच्याविरुध्द गंभीर स्वरुपाचे 27 गुन्हे दाखल आहेत. त्यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी गतवर्षी आणि चालू वर्षात प्रतिबंधक कारवाई केली होती.
एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगाराचं सलमान गुडुभाई पटेल (वय 27 वर्षे, रा. प्लॉट नं.72, विष्णु नगर भाग-2, मजरेवाडी, सोलापूर) असं नाव आहे. त्याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाणे तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे विविध कलमाखाली 09 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तडीपार आदेशाचा भंग केला असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
त्याच बरोबर एम. पी. डी. ए. अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचं अश्रफअली ऊर्फ टिपू मन्नान ऊर्फ मुनाफ (वय -33 वर्षे, रा. 793 शुक्रवार पेठ, सोलापूर) नाव आहे, त्याच्याविरुद्ध साथीदारांच्या मदतीने चाकू, सुरा, लोखंडी पाईप, रॉड आदी प्राणघातक शस्त्रानिशी जबरी चोरी, खंडणी, गृहअतिक्रमण करणे, कुणाचा प्रयत्न करणे आणि तडीपार आदेशाचा भंग करणे अशा गंभीर स्वरुपाचे 07 गुन्हे सोलापुर शहरात दाखल असून त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांनी त्यास गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी कारवाई केली होती.
या तिन्ही आरोपींमध्ये कोणताही बदल न झाल्याने ही स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या सेवाकालातील ही स्थानबद्धतेची पाचवी कारवाई असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची मानली जातेय.
