मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सरपंच वाडकर यांनी साधला व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

shivrajya patra

25 हजार सरपंचांमधून मिळाली संधी; पुणे विभागाचे केले प्रतिनिधित्व..!

सोलापूर : भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) च्या वतीने सोमवारी "सरपंच संवाद" या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात कासेगांवचे सरपंच यशपाल वाडकर यांनी साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. राज्यातील 25 हजार सरपंचांमधून सरपंच वाडकर यांना ही सुवर्णसंधी मिळाली. त्यांनी पुणे विभागाचे प्रतिनिधित्व केले.

"सरपंच संवाद" या ऑनलाईन कार्यशाळा या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रश्नांची माहिती व निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत महाराष्ट्रभरातील 25 हजार सरपंच दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यात मोजक्या 07- 08 सरपंचांना आपल्या गावातील कार्याचा आढावा सांगण्याची संधी मिळाली. पुणे विभागात लोकनियुक्त यशपाल वाडकर (ग्रामपंचायत कासेगाव) या एकमेव सरपंचांना मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी कासेगांवच्या विकासाची यशोगाथा सांगितली. 

यात प्रामुख्याने सरपंच संवाद उपक्रमाच्या माध्यमातून सुरु असलेले प्रयत्न, GPDP अंतर्गत CSR निधीच्या माध्यमातून जलसंधारण, कृषी, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण या विविध विषयांवर गावात सुरु असणारे कार्य, मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत राबवले जाणारे वैशिष्टपूर्ण उपक्रम, महिला ग्रामसभेत ठराव करून व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहकार्याने गावात केलेली दारूबंदी आदी विषयांबद्दल मुख्यमंत्र्यांना अवगत केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्याचे कौतुक केले. 

सरपंच वाडकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने कासेगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या निमंत्रणाचा आदरपूर्वक स्वीकार केला, तसेच कार्यक्रमास येण्याचे आश्वासन दिले. ही कासेगांवसाठी गौरवाची बाब आहे. 

या कार्यशाळेस सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे यशपाल वाडकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते तर तिकडे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम,  मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा MITRA चे CEO प्रवीणसिंह परदेशी, एकनाथ ढवले, QCI चे जिग्नेश शाह, दिलीपसिंह बैस, श्रीकर परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.

To Top