कदम आत्महत्या प्रकरण : डोंगरे पिता-पुत्रावरील खटला उच्च न्यायालयात रद्द

shivrajya patra

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यात चर्चेत राहिलेल्या सतीश कदम आत्महत्या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी किसन डोंगरे, त्यांचे पुत्र गुरुराज व नागेश डोंगरे या आरोपींविरुद्ध भरलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने रद्द केला. हा निर्णय महत्वाचा असल्याने त्यास ऑल महाराष्ट्र लॉ रिपोर्टर क्रिमिनल या कायद्याच्या पुस्तकात पान नंबर २३६७ वर स्थान मिळालं आहे.

या खटल्याची हकीकत अशी की, सतीश कदम आणि किसन डोंगरे हे पूर्वी एकत्र कामात होते. त्यांनी समयकात सन 1989 मध्ये तुळजापूर- नळदुर्ग रस्त्यावर जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीत 26 प्लॉट पाडण्यात आले होते. त्यातील 25 प्लॉट विकण्यात आले होते. एक प्लॉट विकायचा राहिला होता. 

सतीश कदम यांच्या मुलाला पुणे येथे चष्म्याचे दुकान काढावयाचे होते, त्यांनी राहिलेला प्लॉट विकण्याबाबत किसन डोंगरे यांच्या मागे तगादा लावलेला होता, परंतु किसन डोंगरे व त्यांच्या मुलांनी यापूर्वी विकलेले प्लॉट सहमतीने विकले आहेत, असे लिहून देण्यासंबंधी सतीश कदम यांना सांगितले होते. 

त्याबद्दल किसन डोंगरे व त्यांची मुले गुरुराज व नागेश हे सतीश कदम यांना त्रास देत होते, त्या त्रासाला कंटाळून सतीश कदम यांनी 25 नोव्हेंबर 2023 रोजी झोपेच्या गोळ्यांचं सेवन आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यांना ताबडतोब उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले, मात्र 29 नोव्हेंबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सतीश कदम यांचा मुलगा प्रसाद कदम याने तुळजापूर पोलीस स्टेशनला डोंगरे पिता-पुत्रांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती.

ती फिर्याद रद्द करण्याबाबत डोंगरे पिता-पुत्रांनी ॲड. जयदीप माने (सोलापूर) यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणीदरम्यान तुळजापूर पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र (चार्जशीट) दाखल केले. त्यानंतर दोषारोप पत्र चार्जशीट खटला रद्द करण्यात यावा, असा अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेत दाखल करण्यात आला.

या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, त्या प्लॉट विक्रीचे पैसे मयत सतीश कदम यांनी चेकने स्वीकारले आहेत आणि ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली आहे. सतीश कदम हे उच्च रक्तदाब व मधुमेहाबद्दल त्रस्त होते, त्याचबरोबर ते व्यसनी होते, असं आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दवाखान्यात दाखल झाल्यानंतर मयताच्या पोटातील द्रव्य तपासणीकडे रासायनिक तज्ञाकडे पाठवण्यात आले नाही, सतीश कदम यांनी आत्महत्या केली, असं गृहीत धरूनच पूर्ण तपास करण्यात आला आणि दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. ते रद्द होण्यास पात्र आहे, असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला. 

त्यावर खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी डोंगरे पिता-पुत्रांवरील खटला रद्द करण्याचे आदेश दिले.

या खटल्यात आरोपी डोंगरे पिता-पुत्रांतर्फे ॲड. जयदीप माने (सोलापूर), ॲड. आर. एस. उर्फ रामचंद्र पाटील (धाराशिव) यांनी तर सरकारतर्फे ॲड. वि. के. कोटेचा आणि मूळ फिर्यादीतर्फे ॲड. बी. आय. महाजन यांनी काम पाहिले.  

... चौकट 

हा निर्णय महत्वाचा !

हा निर्णय महत्वाचा असल्याने या निर्णयाला ऑल महाराष्ट्र लॉ रिपोर्टर क्रिमिनल या कायद्याच्या पुस्तकात पान नंबर २३६७ वर स्थान मिळाले आहे.

To Top