संभाजी शिवाजी खवळे याची चारित्र्य पडताळणी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिली नसल्याचा संतोष कांबळे यांचा लिखित स्वरूपात आरोप आहे.
कुर्डूवाडी नगर परिषद मध्ये सन २०२४ मध्ये संभाजी शिवाजी खवळे (सफाई कर्मचारी) हे आरोग्य विभागात अनुकंपा तत्त्वावर नोकरीस लागले आहेत. कुर्डूवाडी पोलिस स्टेशनमध्ये 2017 साली भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 325, 504, 506 अन्वये 28 जानेवारी रोजी या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
त्या कर्मचाऱ्यानं नियुक्तीवेळी हा गुन्हा लपवून ठेवलेला आहे. त्यातच सेवा दरम्यान कोणत्याही प्रकारची माहिती प्रशासनास दिलेली नाही. यासंबंधी मुख्याधिकारी कुर्डूवाडी नगर परिषद, प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी, पोलिस निरीक्षक कुर्डूवाडी व उपविभागीय पोलिस अधिकारी करमाळा विभाग करमाळा तसेच पोलिस अधिक्षक (सोलापूर ग्रामीण) यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करुन देखील या बाबतीत वरील अधिकाऱ्यांनी दखल न घेता चुकीच्या पद्धतीने सेवाप्रविष्ठ झालेल्या व्यक्तीस जणू अभय देण्याचे काम केलेले आहे. 
त्या व्यक्तीचं चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी पत्राची मागणी केली असता, उपरोक्त कार्यालयांनी सदरचे प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे. सदर बाबतीत महाराष्ट्र सेवा नियम १९७९ व प्रशासनिक नैतिकतेचे उल्लंघन झालेलं आहे. या प्रकरणाची संबंधीत कर्मचाऱ्यावर योग्य त्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून कारवाई करावी, अशी उपोषणकर्ते संतोष कांबळे यांची मागणी आहे.
या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे, लोक आयुक्त, मुंबई, सचिव नगर विकास मंत्रालय, मुंबई आणि पोलिस महासंचालक, मुंबई यांना पाठविण्यात आल्याचं तिसरी आँख मानवाधिकार संघटन जिल्हा अध्यक्ष संतोष कांबळे यांनी म्हटलंय.
