सोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळ, मुंबई व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2025-26 साठी कडधान्य खरेदीस प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व NCCF मार्फत मुग, उडीद व सोयाबीन खरेदीकरीता 30 ऑक्टोबर 2025 पासून नोंदणी सुरू करण्यात आली असून प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये
मूग 8,768 रूपये प्रति क्विंटल,
उडीद 7800 रूपये प्रति क्विंटल,
सोयाबीन 5328 रूपये प्रति क्विंटल
असे केंद्र शासनाने आधारभूत दर निश्चित केले आहेत.
राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोन केंद्रीय नोडल एजन्सींची जिल्हानिहाय खरेदी केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत. नाफेड - अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा,धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, परभणी, पुणे, सांगली, सातारा,वर्धा, वाशिम, संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ,भंडारा, गडचिरोली. NCCF - नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, हिंगोली, चंद्रपूर,नागपूर तसेच सोलापूर जिल्ह्याकरीता सोयाबीन, उडीद व मूग खरेदी केंद्र पुढीलप्रमाणे आहेत.
बार्शी - बार्शी कृ.उ.बा.स - तुळजाभवानी कृषी साधन व पुरवठा सहकारी संस्था मर्या, उंबरगे
मंगळवेढा - मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि, मंगळवेढा
पंढरपूर - पंढरपूर कृ.उ.बा.स - पंढरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि, पंढरपूर
माळशिरस – अकलुज - शेकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि, अकलुज.
अक्कलकोट - अक्कलकोट कृ. उ. बा. स - वि.का. सेवा सहकारी सोसायटी मर्या. किणी
करमाळा - कृ.उ.बा.स - विठ्ठल सर्वसाधरण सहकारी संस्था मर्या, मांगी
कुर्डुवाडी - कृ.उ.बा.स - माढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. माढा.
ही योजना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरीता राबविण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांनी मुग, उडिद व सोयाबीन विक्रीकरीता आपल्या गावाजवळील नाफेड/NCCF च्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जावुन 7/12 उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. नोंदणी ऑनलाईन पध्दतीने PoS मशिनद्वारे करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बैंक पासबुक, चालु वर्षाचा 7/12 उतारा, पीकपेरा इ. कागदपत्रांसह नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. तसेच खरेदीकरीता आपणास SMS प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा.
तरी जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम व व्यवस्थापकीय संचालक श्रीधर बी. डुबे-पाटील तसेच संचालक मंडळ यांनी केलं आहे.
