सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या राज्यभर "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने, 14 ऑक्टोबर या दिवशी "मिशन स्वाभिमान करसंकलन मोहीम" राबवण्यात आली होती.
या मोहिमेत एका दिवसात सर्वात जास्त कर संकलन केलेल्या ग्रामपंचायतींमधून कासेगांव ग्रामपंचायतीचा दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रथम क्रमांक आला. याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. 
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांच्या हस्ते कासेगांवचे लोकनियुक्त सरपंच यशपाल वाडकर, ग्रामपंचायत अधिकारी रतन कलाल, कर्मचारी दिनेश भोसले यांनी सत्कार स्वीकारला. 
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, सहाय्यक गटविकास अधिकारी बी.सी. पाटील, अभियान कक्ष अधिकारी शिवराज राठोड आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रत्येक तालुक्यातील 06 ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी संजय पाटील यांनी केले. तर सुहास चेळेकर यांनी आभार मानले.
