
त्यागाची भूमी असा लौकिक असलेल्या कासेगांवचे भूमिपूत्र हुतात्मा शिवराम विश्वनाथ चौगुले यांच्या बलीदानाची प्रेरणा भावी पिढ्यांना देणारा स्मृतिस्तंभ त्या शेजारीचं उभारण्यात आलाय. हे स्मृतिस्तंभ गांवच्या गौरवाची प्रतिकं आहेत.
शहीद शिवराम चौगुले यांच्या 32 व्या स्मृतिदिनी, गांवच्या अभिमान आणि गर्वाची प्रतिक फुलमालांनी सजविण्यात आली होती. माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक नेताजी पाटील, राजाराम चौगुले,उळेगांव चे उपसरपंच नेताजी खंडागळे, माजी सैनिक नबीलाल शेख, नागनाथ जाधव, फिरोज तांबोळी, महात्मा गांधी तंटामुक्त गांव समितीचे माजी अध्यक्ष अल्लाऊद्दीन शेख, निशीकांत पाटील, सरकार पाटील, विश्वजीत चौगुले, हुतात्मा पुत्र प्रविण शिवराम चौगुले, पुतणे समाधान हणमंत चौगुले, बालाजी चौगुले, रणजीत चौगुले, चंद्रकांत चौगुले यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्प अर्पित करून अभिवादन करण्यात आले.
... असा होता तो बलीदानाचा क्षण !
DATED: 02 नोव्हेंबर, 1993
वीर गाथा
दिनांक, 02 नोव्हेंबर 1993 रोजी काश्मीर मधील गांव बुदन, तालुका सोपोर, जिल्हा बारामुल्ला मध्ये एका अतिरेक्याजवळ हत्यारे आहेत, अशी बातमी लागल्यावर 19 मराठा लाईट इन्फट्रीच्या अल्फा कंपनीच्या नंबर एक प्लाटूनला धाड घालून ती हत्यारे जप्त करण्याचा आदेश मिळाला, ही टोळी वाटरगांव कैम्पमधून संध्याकाळी सात वाजता रवाना झाली. तिच्यामध्ये नं. 2779130 लान्स नायक शिवराम विश्वनाथ चौगुले हे आघाडीला होते.
एक रायफल व बराचसा दारुगोळा जप्त करून परत येत असताना गावाच्या कडेला असलेल्या घरातून काश्मीरी उग्रवाद्यांनी या टोळीवर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. तेव्हा लान्स नायक शिवराम चौगुले व या टोळीच्या जवानांनी जबरदस्त गोळीबार करून प्रत्युत्तर दिले व कोंडीत पकडले. हे पाहून अतिरेक्यांची तारांबळ उडाली व ते अंधाधूंद गोळीबार करून पळू लागले. शिवरामने एका पळून जाणाऱ्या अतिरेक्याला आपल्या अचूक नेमबाजीने जागच्या जागी ठार केले, व एक रायफल व बरीचशी काडतुसे हस्तगत केली. तेवढ्यात दुसरा अतिरेकी पळताना दिसल्यावर ला. नायक शिवराम चौगुले ने गोळ्यांच्या भडीमाराची व स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पाठलाग करून त्याला हत्यारासहित जिवंत पकडले. दोघांमध्ये खडाजंगी जुंपली. तगड्या शिवरामने त्या धिप्पाड अतिरेक्याला इंचभर सुद्धा हलू दिले नाही. ही खडाजंगी सुरु असताना दुसऱ्या एका अतिरेक्याने डाव साधला व शिवरामला पाठीमागून गोळीचा निशाना बनवला प्राणघातक जखमी होऊन सुद्धा अतिरेक्याची हिसकावून घेतलेली रायफल हातातून सोडली नाही. अतिरेकी आपली रायफल सोडून पळाला. शेवटी घायाळ शिवरामने आपले प्राण सोडले.
मराठ्यांच्या खऱ्या परंपरेप्रमाणे देशाच्या रक्षणासाठी आपले बलीदान देऊन लान्स नायक शिवरामने मराठा रेजिमेन्टच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण पान जोडले आहे, जे येणाऱ्या पिढीला खरा आदर्श राहील.
