मोहोळ/ विष्णू शिंदे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. या निकालात मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी चे भूमीपुत्र विजय नागनाथ लामकाने यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल मोहोळ तालुक्यातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.
विजय लामकाने यांचं 07 वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी जिल्हा परिषद शाळेत झालं. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा त्यांनी राज्यात ४ था क्रमांक पटकावला होता. पुढं त्यांचं 08 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण मोहोळ येथील नागनाथ विद्यालयात तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातील ए. डी. जोशी महाविद्यालयात झालं. पदवीसाठी बी एस् सी पर्यंतचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झालं, असा लामकाने यांचा शैक्षणिक प्रवास आहे.
2021 मध्ये बी एस् सी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सेल्सटॅक्स इन्स्पेक्टर या पदासाठीची परीक्षा दिली. तिथे सन २०२२ त्यांची निवड झाली. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी गटविकास अधिकारी ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याचं प्रशिक्षण सध्या सुरू आहे. याच दरम्यान सन 2024 मध्ये परत त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी लागला असून त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून उपजिल्हाधिकारी या पदासाठी त्यांची निवड झालीय.
त्यांच्या कुटुंबात वडील, आई आणि बहीण असा समावेश आहे. शेती करणाऱ्या पण उच्चशिक्षित अशा त्यांच्या वडिलांनी सातत्याने मुलाच्या शिक्षणासाठी पाठराखण केली व मुलगा विजयने त्यांच्या प्रयत्नांचे चीज केले. उपजिल्हाधिकाारी या पदावर निवड झाली. हा निकाल लागल्यानंतर गावात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
विजयचे वडील नागनाथ हेही वाणिज्य शाखेचे द्विपदवीधर (एम. कॉम.) झालेले आहेत. आपल्या मुलाचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
