अकलूज : येथील विवा हॉस्पिटल आणि जिजाऊ ब्रिगेड (पुणे विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिन आणि भव्य महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या तपासण्या अत्यंत गरजेच्या असल्यामुळे मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घेतला.
शिबिरादरम्यान महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन, थायरॉइड, ब्लड शुगर अशा महत्वाच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात विवा हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रीती गांधी यांनी महिलांना येणाऱ्या दैनंदिन आरोग्य समस्या, गर्भाशयाचे विकार इत्यादी विषयांवर सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी महिलांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून सांगितले.
डॉ. प्रीती गांधी यांनी महिला आरोग्य, मासिक पाळीतील समस्या, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी याबाबत मोलाचं मार्गदर्शन केले. महिलांनी त्यांच्या प्रश्नांना मुक्तपणे विचारत संवाद साधला.
त्यानंतर डॉ. जयदीप काळे यांनी आयव्हीएफ (IVF), वंध्यत्व उपचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि यामुळे हजारो जोडप्यांच्या आयुष्यात आलेल्या बदलांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी महिलांच्या प्रजनन आरोग्याबाबत असलेल्या गैरसमजांचे निरसन केले. महिलांनी IVF, हार्मोनल समस्या व वंध्यत्वाविषयी अनेक प्रश्न विचारून शंका समाधान करून घेतले.
शिबिराची विशेष आकर्षक माहितीपर सत्र डॉ. मीनाक्षी जगदाळे यांनी घेतले. स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असून संपूर्ण समाजाच्या आरोग्याची जननी आहे. तिचे आरोग्य मजबूत असेल तर कुटुंब, समाज आणि पुढील पिढी सर्वच सशक्त राहते.
महिलांनी स्वतःकडे शेवटी पाहण्याची सवय बदलून ‘मी प्रथम निरोगी’ हा विचार स्वीकारला पाहिजे.”त्यांनी 'स्त्री–कुटुंब–समाज' या त्रिसूत्रीचं नाते, महिलांनी स्वतःची आरोग्य जाणीव वाढवण्याची गरज यावर अत्यंत प्रभावी अशा पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यांचं मार्गदर्शन महिलांना प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांकडून केक कापून बालदिन साजरा करण्यात आला आणि वातावरण आनंदाने भरून गेलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका थोरात हिने केले.
या शिबिरामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबतची जागरूकता वाढीस लागली असून समाजाच्या सुदृढतेसाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विवा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, कर्मचारी वर्ग, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी सौ. सुषमा पाटील उपाध्यक्ष, सौ. सुवर्णा शेंडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शब्दांकन : संजय निंबाळकर (दसुर)
