सोलापूर : निमित्त तस्संच आहे ... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अवहेलनेचं... ! या प्रकरणात सामाजिक दुही माजवू पाहणारे सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलकर्णी व तालुक्याचे तहसिलदार संतोष कणसे यांच्याविरुध्द योग्य त्या कायद्याने प्रशासकिय व फौजदारी कारवाई करण्याची मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (जुने) प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ केलाय.

सांगोला तालुक्यातील मौजे चिणके येथील मालमत्ता क्र. ७२७ मध्ये छत्रपती संभाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे वसविले होते. त्यापैकी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गैरमार्गाने हटवून गटविकास अधिकारी कुलकर्णी व तहसिलदार कणसे यांनी महामानवाच्या पुतळ्याची अवहेलना केली असल्याचा बेमुदत धरणे आंदोलनास बसलेल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. 
उभयतांविरुध्द प्रशासकिय व फौजदारी कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी चिणके येथून सोमवारी, 03 नोव्हेंबर रोजी पायी लाँग मार्चला प्रारंभ केला. हे सर्व जण शुक्रवारी, 07 नोव्हेंबर रोजी सोलापुरात पोहोचले. त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबलेला आहे.
यामधील महत्वाचा मुद्दा असा की, पंचायत समिती प्रशासन व तहसिल प्रशासनावर त्या गावातील विनायक मिसाळ यांचं वर्चस्व असून त्यांच्या सांगण्यावरुन प्रशासनाने खोटी व दिशाभूल करणारी माहिती वरिष्ठ कार्यालयास वारंवार आंबेडकरी अनुयायांसंबंधी अवास्तव भय निर्माण करण्यासाठी आपणांस वारंवार कळविलेली आहे. त्याची देखील आपण शहानिशहा करावी, असा आग्रह या आंदोलनकर्त्यांचा आहे.
आंदोलन काळात त्यांच्या जिवितास कोणताही धोका अथवा दगा-फटका झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी, शासन, प्रशासन व पोलिस यंत्रणेवरतीच राहणार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अवहेलना करणारे गटविकास अधिकारी कुलकर्णी व तहसिलदार संतोष कणसे यांच्या विरुध्द योग्य त्या कायद्याने प्रशासकिय व फौजदारी कारवाई करण्यात यावी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता, त्या ठिकाणी सन्मानपूर्वक वसविण्यात यावा, यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.
हे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधिक्षक (सोलापूर ग्रामिण विभाग) अतुल कुलकर्णी आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांनाही देण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय.

