सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि 01नगरपंचायत निवडणूक विषयक कामकाज सुरळीतपणे पार पाडून निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायती यांचा सदस्य व अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व 01 नगरपंचायती यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, जिल्हा सह आयुक्त योगेश डोके यांच्यासह सर्व संबंधित नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व 01 नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेले सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची सविस्तर माहिती घ्यावी. 

राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना, पत्र, हँडबुक याप्रमाणे दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी व निवडणूक अत्यंत शांततामय वातावरणात व निर्भयपणे होतील, यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचित केले आहे.

सर्व नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्व संबंधित प्रांत अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार यांनी संयुक्तपणे बैठका घ्याव्यात. यांतर्गत काम करताना लोकसभा, विधानसभा निवडणुकी प्रमाणे माहिती संकलित करावी. यामध्ये सर्व संबंधित अधिकारी व यंत्रणांना जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने आवश्यक त्या सूचना वेळोवेळी देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख यांनी राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद व एका नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याची माहिती देऊन त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी व या निवडणुका पार पाडण्यासाठी नियुक्ती केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी करावयाच्या कामकाजाची सविस्तरपणे माहिती दिली. 

तसेच लवकरच राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त योगेश डोके यांनी बार्शी, अकलूज, मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, कुर्डूवाडी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी व दुधनी या नगर परिषद तर अनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका कार्यक्रम जाहीर झालेला असून या अंतर्गत 152 प्रभागातून 289 सदस्य निवडले जाणार तर यासाठी 499 मतदान केंद्र निर्माण केल्याचे सांगितले.

याकरिता 12 निवडणूक निर्णय अधिकारी, 12 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आल्याचे सांगितले.

To Top