सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त जनजागृती शिबीराचे आयोजन एस.एस. म्हेत्रे उर्दू हायस्कूल येथे करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व शाळेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक शमशोद्दीन नदाफ, विधीज्ञ शिवकैलास झुरळे, विधीज्ञ सरफराज शेख, आरिफ तांबोळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मेराजबानो शेख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
शिबीरात विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क, बालसंरक्षण कायदे, आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
विधीज्ञ शिवकैलास झुरळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून, मानवी सन्मान आणि सामाजिक परिवर्तनाचे सामर्थ्य आहे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि न्याय प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे.” त्यांनी कायदेशीर मदतीसाठी १५१०० या हेल्पलाइन क्रमांकाची माहितीही दिली.
विधीज्ञ सरफराज शेख यांनी पोक्सो कायद्याअंतर्गत बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम याविषयी विद्यार्थ्यांना सुलभ भाषेत माहिती दिली. गैरवर्तनाची ओळख, सुरक्षिततेचे उपाय आणि पालक व शिक्षकांशी संवादाचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
अधिक्षक शमशोद्दीन नदाफ यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच बालस्नेही केंद्राचे कार्य आणि महत्त्व विद्यार्थ्यांपुढे मांडले.
मुख्याध्यापिका श्रीमती मेराजबानो शेख यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर साक्षरता, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत झाली आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुर्तुलऐन शेख यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
