'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन

shivrajya patra

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांचं सोमवारी, 20 ऑक्टोबर रोजी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अविस्मरणीय शोले चित्रपटातील त्यांची ' हम अंग्रेजों के जमाने का जेलर है' ही अजरामर राहिली, त्यांच्या निधनाने  'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड गेला. ते मृत्यूसमयी 84 वर्षांचे होते. ऐन दिवाळीच्या धामधुमीत त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरलीय. 

त्यांच्यावर मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. कुटुंबाने त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करत त्यांचे अंत्यसंस्कार अत्यंत खाजगी पद्धतीने पार पाडले.

असरानी यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते काही काळापासून आजारी होते. असरानी यांनी त्यांची पत्नी मंजू यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, त्यांचं निधन सार्वजनिकरित्या जाहीर न करता, अगदी शांतपणे अंत्यसंस्कार करावेत. त्यांच्या इच्छेनुसार, कुटुंबाने मीडियापासून दूर राहून कोणतीही सार्वजनिक घोषणा न करता अभिनेत्याचे अंतिम संस्कार पार पाडले.

मागील काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मात्र सोमवारी, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फुफ्फुसांच्या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूची पुष्टी केली.

असरानी यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी निधन होण्यापूर्वी काही तास आधी इंस्टाग्रामवर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी असं होते. 

To Top