सोलापूर : घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयासमोर सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट नं. 2) दिपक कंखरे यांनी सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने (वय-34 वर्षे) आणि राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय-35 वर्षे) या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, जुळे सोलापुरात दिवसाढवळ्या घरफोडी केलेल्या 02 सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकांनं सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने आणि राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर या आरोपींना जेरबंद केलं.
उभयतांकडून सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने, 62 तोळे चांदीचे दागीने- वस्तू तसेच गुन्हा करण्याकामी आरोपींनी वापरलेली 01 मोटार सायकल असा 3,15,200 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आलाय. 
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटणीस नगर अंबिका रेसिडेन्सीमधील रहिवासी सौ. रेखा कैलास चौधरी यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार 24 सप्टेंबर रोजी घडला.
त्याच दिवशी दुपारी जुळे सोलापुरातील विशाल नगरात सौ. पुनम सतिश वांगी (वय-43 वर्षे) यांच्याही घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 22,000 रुपयांची रोख रक्कम व 06 ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसुत्रे व चांदीचे आरतीचे साहित्य असा अंदाजे 1,17,000 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.
याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांकडे दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार, यांनी गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिली.
त्यात ओळख पटलेल्या आरोपींपैकी 30 सप्टेंबर रोजी रोजी सपोनि खेडकर, यांनी सुर्यकांत उर्फ चिन्या माने (रा. मोरया हौसींग सोसायटी, वेताळ नगर, चिंचवड, पुणे) यास पिंपरी चिंचवड येथून तर 04 ऑक्टोबर रोजी दुसरा आरोपी राम उर्फ रामजाने क्षीरसागर (रा. मु.पो.वाघोली ता. कळंब जि. धाराशिव) यास अटक केली. उभयतांकडून 3,15,200 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. 
उभय आरोपीकडे गुन्ह्यातील मद्देमाल हस्तगत केल्यावर त्यांच्या विरुद्ध दाखला असलेल्या गुन्ह्याची माहिती संकलित करून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी न्यायालयापुढे सादर केली. त्यात पिंपरी चिंचवड येथे यापूर्वी दाखल असलेल्या घरफोडीच्या सुमारे 13 गुन्ह्याची माहिती संकलित करुन न्यायालयात सादर केली. तसेच आरोपी नामे राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर यांचेवर देखील सोलापूर, पुणे येथे यापूर्वी असलेल्या घरफोडीच्या सुमारे 07 गुन्ह्याची माहिती संकलित करुन ती न्यायालयात सादर केली.
आरोपी सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने याने चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने, त्याचा मोठा भाऊ चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने, रा. पिंपरी चिंचवड, पुणे यांचेकडे दिल्याचे तपासामध्ये सांगितल्याचे तसेच चंद्या माने हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याचेवर देखील घरफोडी, जबरी चोरीचे यापुर्वी पुणे, सातारा, सोलापूर, पिंपरी चिंचवड येथे सुमारे 28 गुन्हे दाखल असल्याची माहिती सपोनि शैलेश खेडकर यांनी न्यायालयापुढं ठेवली.
आरोपी चंद्या माने हा आरोपी राम उर्फ रामजाने क्षिरसागर याचा त्यामधील काही गुन्ह्यात साथीदार असल्याचे सांगून, त्याचेकडून गुन्ह्यातील उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करावयाचा आहे, अशी माहिती न्यायालयात सादर केली. दोन्ही अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने व त्याचे वर्तनामूळे महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरीकांचे मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने, मिळविलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने आरोपीस जामीन नाकारण्यात यावा, असं तपासी अधिकारी यांनी म्हणणे सादर केले.
सरकार पक्षाचे वतीने सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीमती पी. एस. मांजरे, यांनी आरोपीवर दाखल असलेले गुन्हे, यावरुन असे दिसते की, त्याचे वागणुकीत काही एक फरक पडत नाही. आरोपी पुन्हा त्याच पध्दतीने गुन्हे करत असल्याचे, निदर्शनास आणुन दिले. सध्या दिवाळी सणउत्सव असल्याने आरोपी पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करतील, तसेच तपासाधीन प्रस्तुत गुन्ह्यातील उर्वरीत मुद्देमाल देखील हस्तगत करण्याची कारवाई पोलीसांकडून चालू असल्याने, आरोपीस जामीन नामंजूर करावा, असा युक्तिवाद सरकार पक्षाचे वतीने न्यायालयात करण्यात आला.
आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झालेनंतर, तपासी अधिकारी यांनी मांडलेले म्हणणे व सहायक सरकारी अभियोक्ता यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट नं. 2) दिपक कंखरे यांनी दोन्ही आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
