लढवय्या कामगार नेते कॉ. सलीम मुल्ला यांचं निधन; माकप व सीटू तर्फे अखेरची लाल सलामी

shivrajya patra
सोलापूर : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माकप) चे जिल्हा समिती सदस्य आणि सीटूचे राज्य सचिव कॉ. सलीम मुल्ला (वय 63) यांचे आज पहाटे उपचारादरम्यान राघोजी हॉस्पिटल येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी, 21 ऑक्टोबर रोजी  संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

कॉ. सलीम मुल्ला हे सीटूचे लढाऊ, कार्यतत्पर आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारे नेते म्हणून परिचित होते. वाहतूक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे विविध प्रश्न प्रशासनाकडे प्रभावीपणे मांडले आणि मार्गी लावले.

ते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही कार्यरत होते. सन 2004 ते 2009 दरम्यान त्यांनी विधिमंडळातील कामकाजात मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील विविध सामाजिक, आर्थिक आणि कामगार प्रश्नांवर माहिती संकलन, प्रस्ताव तयार करणे आणि पाठपुरावा करणे या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत दक्षतेने पार पाडल्या.

कामगार चळवळीतील एक समर्पित, दिग्गज आणि तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख कायम राहिली. त्यांच्या निधनाने कामगार वर्ग आणि डाव्या चळवळीने एक खंदा नेता गमावला आहे.

माकप व सीटू तर्फे कॉ. सलीम मुल्ला यांना अखेरची लाल सलामी देण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर, माकपचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख मेजर आणि सीटूचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख यांनी त्यांच्या परिवाराचं सांत्वन केले.

To Top