सोलापूर : 'उमंग मीडिया नेटवर्क'च्या संयुक्त अभिमानाने 'किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र २०२५' या नव्या शोची घोषणा झाली असून याची महाराष्ट्रभर महिलावर्गात उत्सुकता पाहायला मिळत आहे. या शोच्या निमित्ताने महाराष्ट्रात 08 प्रमुख शहरात ऑडिशन पार पडले. त्यातही सोलापूर येथे होत असलेल्या ऑडिशनदरम्यान मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येत्या 10 आणि 11 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्राची किचन क्वीन निवडली जाणार असल्याची माहिती उमंग मीडिया नेटवर्क सह-संस्थापक निकिता तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
राज्यातील 10 शहरात किचन क्वीन च्या चाचणीसाठी ऑडिशन करण्याचे निश्चित झाले होते, त्यात 08 ठिकाणचं ऑडिशन पार पडले आहे. प्रत्येक ठिकाणी पाककलेचं कौशल्य दाखविण्यासाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक ठिकाणाहून 05 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. 
शुक्रवारी दुपारी 12 वा. पासून सोलापुरातील नि:शुल्क नोंदणी ऑडिशनला प्रारंभ झाला, तो सायंकाळी संपणार आहे. इथलाही सहभागी महिला स्पर्धकांचा उत्साह मोठा आहे. प्रत्येक स्पर्धकानं आपलं पाककलेचं कौशल्य पणाला लावून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आल्याचे निकिता तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातील 09 वं ऑडिशन सोलापुरात होत आहे. या ऑडिशननंतर कोल्हापुरात पाककलेचं ऑडिशन होईल. या सर्व ऑडिशन्समधून पाककलेतील निवड झालेल्या 50 स्पर्धकांची अंतिम फेरी होईल. मुंबईत 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीतून महाराष्ट्राची Kitchen Queen ! निवडली जाणार आहे. येत्या काळात 'उमंग मीडिया नेटवर्क'च्या संयुक्त विद्यमाने असे वेगवेगळे शो घेतले जातील, असंही निकिता तिवारी यांनी शेवटी सांगितले.
यावेळी उमंग मीडिया नेटवर्क सह-संस्थापक शंवनन पलानी हेही उपस्थित होते.


