सोलापूर/सोहेल शेख : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे वाहतूक कामगार नेते कॉ. सलीम मुल्ला यांचं नुकतेच अकाली निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी सीटू व माकप तर्फे रविवारी, 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05.00 वाजता दत्त नगरातील सिटू कार्यालयात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) यांनी दिलीय.
भा. क. प. (मार्क्सवादी) पक्षाचे जिल्हा समिती सदस्य तसेच सीटूचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ. सलीम मुल्ला (वय- 63 वर्षे) यांचं अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. कॉ. सलीम मुल्ला यांनी आजवर वाहतूक संघटना तसेच अन्य कामगार संघटनांद्वारे हजारो कामगारांचे प्रश्न प्रशासनापुढे प्रभावीपणे मांडले. 
त्यांनी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असताना कामगार वर्गाच्या प्रश्नांना विधिमंडळ पातळीवर पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली. कामगार वर्गाच्या हक्कांसाठी अखंड झटणारे व त्यांच्या जाण्याने चळवळीने एक खंदा लढवय्या, समर्पित व तळमळीचा नेता हरपल्याची भावना कामगार आणि श्रमकऱ्यांत पसरलीय.
स्व. कॉ. सलीम मुल्ला यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी दत्त नगरातील पक्ष कार्यालयात आयोजित श्रध्दांजली सभेला सर्व कामगार, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी उपस्थित राहून कॉ. सलीम मुल्ला यांना लाल सलामी द्यावी, असं आवाहन जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) यांनी केलंय.
