सोलापूर : विक्री केलेल्या जमिनीची तलाठ्यानं धरलेली नोंद मंजूर करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्विकारलेल्या वाघमारे मंडल अधिकाऱ्याला एसीबी च्या पथकानं रंगेहाथ जाळ्यात पकडलंय. राजेंद्र भगवान वाघमारे (वय-53 वर्ष) असं लाचखोर मंडल अधिकाऱ्याचं नांव आहे. ही घटना पंढरपूर तहसील कार्यालय रायगड भवनाच्या पाठीमागे गुरुवारी सायंकाळी घडलीय. लाचखाऊ वाघमारे याच्याविरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आलंय.
यासंबंधी मिळालेली अधिक माहिती अशी की, विक्री केलेल्या जमिनीची नोंद तलाठ्याने धरल्यानंतर, मंडल अधिकाऱ्याने रद्द केली होती. ती नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी राजेंद्र वाघमारे यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 40 हजार रुपये लाच घेण्याचे निश्चित झाले होते. 
दरम्यान तक्रारदाराने याप्रकरणी पुणे एलसीबी कार्यालयाकडे, 08 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली, दुसऱ्या दिवशी, 09 ऑक्टोबर रोजी पडताळणी करून त्याच दिवशी सायंकाळी पंढरपूर तहसील कार्यालय, रायगड भवनच्या पाठीमागे 40 हजार रुपयाची लाच स्विकारताना वाघमारे एलसीबी पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले.
पोलीस निरीक्षक (ला.प्र.वि., पुणे) प्रविण निंबाळकर पोलीस निरीक्षक (ला.प्र.वि., पुणे) यांनी पडताळणी अधिकारी म्हणून कारवाई केली. लाचखाऊ वाघमारे यांच्याविरुद्ध पंढरपुर शहर पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक (ला.प्र.वि., सोलापूर) रविंद्र लांभाते यांच्याकडं या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आलाय.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे), अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील (ला.प्र.वि. पुणे) अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले (ला.प्र.वि. पुणे ) यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलीय.
