22 वर्षानंतर नूतन विद्यालयातील माजी विद्यार्थी पुन्हा बसले त्याच बेंचवर

shivrajya patra

सोलापूर  : नव्या रूपातील तीच शाळा, तेच बेंच, तेच वातावरण, तेच मित्र -मैत्रिणी अशा रूपात 22 वर्षानंतर माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले. निमित्त होते माजी विद्यार्थ्यांचा मेळावा म्हणजे" गेट-टुगेदर " चं.

निमित्त होते- इतिहास प्रसिद्ध असलेल्या आष्टी तालुका मोहोळ येथील नूतन विद्यालयातील 2002 -2003 च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा नूतन विद्यालयात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक अण्णासाहेब भालशंकर हे होते.

या मेळाव्याच्या प्रसंगी प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर वसेकर, निवृत्त शिक्षक बी. आर. नलवडे, सुरेश चव्हाण, तसेच शाळेचे पर्यवेक्षक धैर्यशील पवार, शाळेचे वरिष्ठ लिपिक नितीन पंढरे, त्याचप्रमाणे सेवक गौतम कांबळे, साधू बुवा वाघमोडे, निवृत्त ग्रंथपाल लालू आवाने, लिपिक संतोष दुर्गे इत्यादी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. 

शाळेच्या या माजी विद्यार्थ्यांमध्ये पुणे येथील कार्डिओलॉजिस्ट आणि हृदयरोग तज्ञ डॉ. काकासाहेब भोसले, तसेच पुणे येथील अधीक्षक अभियंता सुहास गायकवाड, त्याचप्रमाणे टीसीएस अभियंता लक्ष्मण व्यवहारे (पुणे), शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथील प्रा. स्वप्निल गुंड, एम क्यू आर फार्माचे व्यवस्थापक कृष्णा सुळे (सोलापूर ), पुणे येथील फायनान्स ऑफिसर राजेश अंदुरकर तसेच माजी विद्यार्थिनी सोनाली पाटील (सातारा)प्रियंका चव्हाण, प्रा. अश्विनी आढवळकर, निलेश गुंड यांच्यासह 90 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. 

याप्रसंगी तत्कालीन शिक्षक तसेच उपस्थित सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची शालेय आवारात मिरवणूक काढण्यात आली. माजी शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मार्गदर्शक शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या. माजी विद्यार्थी मेळाव्याचे प्रास्ताविक पुनम एडके यांनी केले, सूत्रसंचालन कृष्णा सुळे यांनी केले. शाळेला देखील भेट देण्यात आली. कार्यक्रम अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.

या मेळाव्याचे आयोजन निलेश गुंड, लक्ष्मण व्यवहारे, कृष्णा सुळे, सोनाली पाटील, महादेव भोसले इत्यादींनी केले होते. शेवटी स्वप्निल गुंड यांनी सर्वांचे आभार मानले.

To Top