15 व्या वित्त आयोगाच्या कामाच्या बिलासाठी मागितली लाच
सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यांना 02 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. कामाच्या मंजूर बिलाची रक्कम ग्रामपंचायत खात्यातून काढून देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार मिळताच एसीबीने पडताळणी आणि सापळा रचून ही कारवाई केली.
तक्रारीनुसार पार्श्वभूमी
मौजे येळेगाव येथे 15 व्या वित्त आयोगांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. कंत्राटदाराने कामाबाबतचे 01 लाख रुपयांचे बिल मंजुरीसाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा तक्रारदार करत असताना विस्तार अधिकारी खरबस यांनी 2000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 30 ऑक्टोबर रोजी एसीबीकडे करण्यात आली.
पडताळणी आणि सापळा
तक्रार प्राप्त होताच ACB पथकाने त्याच दिवशी पडताळणी केली. पडताळणीदरम्यान खरबस यांनी लाच मागणीची पुष्टी केली. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात जिल्हा परिषद कार्यालयात तक्रारदाराकडून 2 हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7 अंतर्गत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई पोलीस उपआयुक्त/अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोह. अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला यांच्या पथकानं केली.
जनतेस आवाहन
“शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास तात्काळ ACB कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन उपअधीक्षक प्रशांत चौगुले (मो. 9823225465) यांनी केले.
