सोलापूर : मागास वस्ती सुधारणा निधीतील अपहार चौकशीसाठी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दादासाहेब धनाजी सावंत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालय प्रवेशद्वारावर अन्न-पाणी त्याग आंदोलन सुरू केलंय. शनिवारी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनानं चार दिवसात दखल न घेतल्याने, जणू याकडं पाठ फिरवल्याचं दिसतंय.
सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून मागास वस्ती सुधारणा निधी त अपहार केल्याची ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब सावंत यांची तक्रार आहे. 
याप्रकरणी दिलेल्या तक्रारी अर्जावर सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तत्पूर्वी या अपहाराची चौकशी होत नसल्याच्या कारणावरून सावंत यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला होता, त्यानंतर हा चौकशी आदेश निघाला होता.
गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालाची एक प्रत, 07 जुलै रोजी सावंत यांना देण्यात आलीय. त्या अहवालात, ज्यांची चौकशी व्हायला पाहिजे ते वगळून चौकशीचे 'कागदी घोडे' इतरत्र नाचल्याचं दिसल्यावर, सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्याचे पालकमंत्री, सांगोल्याचे आमदार, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना पूर्वसूचना देऊन, बुधवारी 10 सप्टेंबरपासून बेमुदत अन्न-पाणी त्याग आंदोलनास प्रारंभ केलाय. आता या आंदोलनाची दखल कोणतं कार्यालय घेणार ? हा सवाल उरतोच.
