बहुजन शिक्षक पतसंस्थेची सभा खेळीमेळीत संपन्न; सात टक्के लाभांश जाहीर
सोलापूर : येणाऱ्या काळात सभासदांचे आरोग्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती आणि उच्च शिक्षण व परदेशातील शिक्षण यासह विविध योजनाद्वारे कर्मचारी व सभासदांचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पतसंस्थेचे संस्थापक तथा मानद सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली. 
बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर या पतसंस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा बाळे येथील श्री दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. पतसंस्थेचे चेअरमन प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रा. युवराज भोसले, ज्येष्ठ संचालक मिलिंद भालशंकर, प्रफुल्ल जानराव, बाळासाहेब डोळसे, हारून तांबोळी, मंजुश्री खंडागळे, प्रतिभा गायकवाड, प्रभावती भडकुंबे इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उद्धाटक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील निवृत्त अधिकारी दिगंबर ढेपे, प्राचार्य अमोल ढेपे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर पतसंस्थेचे खजिनदार रवी देवकर यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून सर्व विषयांना मंजुरी घेतली. 
यानंतर पतसंस्थेच्या सभासदांचे गुणवंत पाल्यांचे तसेच ज्या सभासदांची सेवानिवृत्ती, पदोन्नती, निवड, नियुक्ती झाली आहे आणि ज्यांनी पतसंस्थेत सर्वाधिक ठेवी ठेवल्या आहेत, अशा सभासदांचा पतसंस्थेच्यावतीने सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

पतसंस्थेच्या पारदर्शक कामकाजाचे दिगंबर ढेपे यांनी कौतुक करीत पतसंस्थेचे आभार मानले. वैभव रणदिवे यांनी विमा संदर्भात माहिती दिली. यावेळी पतसंस्थेतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
पतसंस्थेचे चेअरमन बोधिप्रकाश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. व्हा. चेअरमन प्रा. युवराज भोसले यांनी सभेचे सूत्रसंचालन केले तर संचालक प्रफुल्ल जानराव यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. यानंतर सभासदांना लाभांश वाटप झाल्यानंतर स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली. सभेला जिल्हाभरातून 98 टक्के सभासद उपस्थित होते.
