सोलापूर डिस्ट्रीक्ट लेबर सोसायटीज् को-ऑप. फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
सोलापूर : संस्थेच्या इमारतीखालील मोकळ्या जागेत गाळे बांधून ते भाडे तत्वांवर देत आहोत. त्यामधून येणाऱ्या उत्पन्नातून प्रशासकीय खर्चाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. तसेच लवकरच मजूर संस्थांना जिल्हा परिषदचे कामे मिळण्यासंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्ह्यातील सर्व आमदार व अधिकारी वर्ग यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती सोलापूर डिस्ट्रीक्ट लेबर सोसायटीज् को-ऑप. फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले यांनी दिली.
सोलापूर डिस्ट्रीक्ट लेबर सोसायटीज् को-ऑप. फेडरेशन लि., सोलापूर ची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी,19 सप्टेंबर रोजी अचिव्हर्स फंक्शन हॉल नं. 2 येथे संस्थेचे चेअरमन शंकर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
संस्थेचे व्हाईस चेअरमन मुजीब शेख यांनी प्रास्ताविकेमध्ये प्रथमतः उपस्थितांचे स्वागत केले. तदनंतर दिवंगतांना श्रदांजली वाहण्यात आली. त्यानंतर संस्थेचे सचिव बबलू शेख यांनी अहवाल वाचन केले. प्रतिमेचे पूजन संस्थेचे ज्येष्ठ सभासद व माजी संचालक यांचे हस्ते दिप प्रज्वलीत करुन सभेस सुरुवात करण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्वश्री आजी माजी खासदार व आमदार, मान्यवरांचे आर्शिवादाने मला चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व त्यांचे धन्यवाद मानतो, असं चेअरमन चौगुले यांनी म्हटले.
आपल्या मागण्यांबाबत अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासमवेत काही बैठका झाल्या याची माहिती उपस्थित सभासदांना देऊन, या सभेमध्ये नवीन पतसंस्था नोंदणी करुन मजूर संस्थांना वर्क ऑर्डरव्दारे 50 टक्के इतकी कर्ज स्वरुपात आर्थिक भांडवल पुरविण्यात मानस संस्थेचे चेअरमन यांनी व्यक्त केला. उपस्थित सभासदांनी त्यास एकमताने सहमती दर्शविली. 
अहवाल सालातील जमा खर्च ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मंजूरी देण्यात आली. सदर सालात संस्थेला 14.63 लाख इतका नफा झाला असून आर्थिक वर्षात 75.00 लाखाची गुंतवणूक करण्यात आली. या सभेस मजूर संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी मजूर संस्थेच्या सभासदांना भेट वस्तू म्हणून सोलापूरी सतरंजी देण्यात आली.
मजूर संस्थेच्या चेअरमनच्या मुला-मुलींना दरवर्षी स्व. महादेवराव आवताडे यांच्या स्मरणार्थ 08 वी ते 12 वी पर्यंत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी वा विद्यार्थिनी यांना भेट वस्तू देण्याचा संकल्प करण्यात आला.
या सभेत बोलताना संस्थेचे चेअरमन चौगुले यांनी एका मजूर संस्थेला वर्षातून किमान दोन कामे मिळण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल, तसे न मिळाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद व संबंधित सर्व विभागांना नोटीसा देऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संस्थेचे विद्यमान संचालक शिवाजीराव चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.
या सभेस संचालक सर्वश्री. राजेंद्र सुपाते, चंद्रकांत अवताडे, संजय साळुंके, अरुण घोडके, मानसिंग खंडागळे, अरुण थिटे, यशवंत शिंदे, रोहिदास राठोड, शाम पवार, अभिराज शिंदे, लक्ष्मण मस्के, सौ. सरस्वती साठे, श्रीमती पार्वती गाडे, माजी संचालक सर्वश्री. सरोज काझी, रमेश वाघमारे, बापूसाहेब भंडारे व जिल्ह्यातील सभासद व बंधु व भगिनी तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
