सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर : “आपल्या एका थेंब रक्तामुळे कोणाचे तरी प्राण वाचू शकतात. हा केवळ समाजोपयोगी एक उपक्रम नाही तर जीवनदान देणारे पवित्र कार्य आहे,'' असं प्रतिपादन सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी यांनी केले.
“रक्तदान म्हणजेच जीवनदान” या उदात्त संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा एक सामाजिक व मानवतावादी उपक्रम सालाबादप्रमाणे सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी, 01 सप्टेंबर रोजी (ईद-ए-मिलादुन्नबी) सोशल महाविद्यालय, प्रोफेट फॉर ऑल, एचडीएफसी बँक आणि अतहर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचं उद्घाटन प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते उद्घाटन आणि मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.
रक्तदानाचे महत्व अधोरेखित करताना, प्राचार्य डॉ. तांबोळी यांनी, या कार्यात विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाने घेतलेली पुढाकाराची भावना खरोखरच प्रेरणादायी आहे, असंही म्हटले.
या शिबिरात विद्यार्थ्यांपासून आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा विभागातील खेळाडू तसेच NSS स्वयंसेवक आणि NCC कॅडेट्स यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या सामाजिक उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 110 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाला अमूल्य योगदान दिले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक नारायणकर यांनी NSS स्वयंसेवकांच्या परिश्रमाचं कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची जाणीव जागवणे हीच NSS ची खरी ताकद आहे.” राष्ट्रीय छात्रसेनेचे कॅप्टन डॉ. गॉस अहमद शेख यांनी NCC कॅडेट्सच्या सहभागाचे कौतुक करताना, “देशसेवेबरोबरच समाजसेवा हीदेखील खरी जबाबदारी आहे” असे सांगितले. क्रीडा विभाग प्रमुख डॉ. मुस्ताक शेख यांनी खेळाडूंच्या उत्साहाचे विशेष अभिनंदन केले.
या शिबिरास उर्दू विभाग प्रमुख डॉ. शफी चोपदार, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आसमा खान, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला, भूगोल विभाग प्रमुख डॉ. सचिन राजगुरू, प्रा. राहिसा मिर्झा, प्रा. वाहिद जमादार, प्रा. एम. डी. शेख, प्रा. टी. बी. लदाफ, प्रा. तसलीम वड्डो तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. जैनुद्दीन पटेल व प्रा. इन्नुस शेख उपस्थित होते.
अतहर ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षितरीत्या रक्तदान पार पाडले गेले. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनामागे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, सर्व विभागांचे सहकार्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक नारायणकर यांनी केले. सरतेशेवटी एचडीएफसी बँकेचे उमर विजापुरे, इक्बाल मुजावर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
या रक्तदान शिबिरातून महाविद्यालयाने समाजसेवा, मानवता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवला. “रक्तदान म्हणजे जीवनदान” हा प्रभावी संदेश या शिबिरातून समाजात पोहोचला असून, आगामी काळातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.
... चौकट
मानवाचे जीव वाचविण्यासाठी केले पाहिजे रक्तदान : प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला
याप्रसंगी IQAC समन्वयक व विद्यापीठ सिनेटर प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला यांनी रक्तदान केलं, हे त्यांचं 25 वं रक्तदान होतं. 'आज जगामध्ये बहुतांशी वस्तू ह्या मशीनमध्ये तयार होत आहेत, परंतु मानवी रक्त अजून मशीनमध्ये तयार करता आलेलं नाही. त्यासाठी मानवाने मानवाचे जीव वाचविण्यासाठी रक्तदान केले पाहिजे." असं रक्तदानाचे महत्व विशद करताना डॉ. मुल्ला यांनी म्हटले.
