पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार !

shivrajya patra

आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान उभारण्याचा संकल्प !

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात आज एक ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आधुनिक क्रिकेट प्रशिक्षण, दर्जेदार सुविधा व व्यावसायिक मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. याचबरोबर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान उभारण्याचा संकल्प दोन्ही संस्थांनी केला असून यामुळे सोलापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे. 

विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, संयुक्त सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या करारावर क्रीडा संचालक व प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे आणि सहसचिव चंद्रकांत रेम्बरसू यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. 

यावेळी विद्यापीठाचे कायदा अधिकारी ॲड. जावेद खैरदी, क्रिकेट असोसिएशनचे प्रकाश भुतडा, अॅड. बसवराज सलगर, मुकुंद जाधव, संतोष बडवे, डॉ. विकास पाटील आदी उपस्थित होते.

या सामंजस्य करारानुसार, विद्यापीठाच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी निर्माण करण्यासाठी या कार्याद्वारे प्रयत्न केले जाणार आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनाही मोठ्या व्यासपीठावर येण्याची संधी मिळेल.

करारानंतर बोलताना कुलगुरू प्रा. डॉ. महानवर म्हणाले, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाव्यात, यासाठी विद्यापीठ नेहमीच कटिबद्ध आहे. आज झालेला करार हा सोलापूरच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने म्हणाले, विद्यापीठाच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील क्रिकेट संस्कृती बळकट होईल. भविष्यात येथे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील, असा आमचा विश्वास आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उभारण्यासाठी दोन्ही संस्थांकडून प्रयत्न केले जातील. विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी आभार मानले. 


To Top